Satish Wagh Murder Case Amitesh Kumar : हडपसर येथील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी (९ डिसेंबर) सकाळी अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे शहरापासून जवळपास ४५ किलोमीटर अंतरावरील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला. या घटनेने हडपसरसह पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांबरोबर झालेल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असंही पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर काही तासांनी पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन या प्रकरणाची माहिती दिली. तसेच आतापर्यंत तपास कुठवर आला आहे? किती आरोपींना अटक केली आहे? याबाबतची माहिती देखील दिली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलीस व क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केली आहे. मृत व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच वैयक्तिक वादातून त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. सुपारी देणाऱ्यासही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर चालू आहे. क्राईम ब्रँच व स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटना घडल्यापासून आतापर्यंत वेगवेगळी पथकं काम करत आहेत. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी आतापर्यंत ४५० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्याचदरम्यान त्यांनी एक गाडी शोधून काढली. सतीश वाघ यांचं अपहरण करण्यासाठी व हत्या केल्यानंतर पलायन करण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या कारपर्यंत आम्ही पोहोचलो. त्या कारच्या मदतीनेच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले आणि त्यांनी आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. झोनल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित केला आहे. आम्ही आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करत आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी पोलीस मेहनतीने काम करत आहेत.

हे ही वाचा >> पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी

पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं?

अमितेश कुमार म्हणाले, “या हत्या प्रकरणात पोलिसांनी काल संध्याकाळपर्यंत दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आज दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आतापर्यंत चार जण अटकेत आहेत. सतीश वाघ यांचा काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीबरोबर वाद झाला होता. त्याच वादातून त्यांच्या शेजाऱ्याने वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातून हे अपहरण व हत्या झाली आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या होऊन ३६ तास उलटले तरी पोलीस आरोपींना बेड्या ठोकू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवलं जात होतं. मात्र, पोलिसांनी आता या प्रकरणातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी पवन शर्माला व नवनाथ गुरसाळे या दोघांना वाघोली येथून ताब्यात घेतलं आहे.