राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या वेदनेवर अभिजात संगीताच्या क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी आपल्या स्वरांची आणि संवेदनेची फुंकर घातली. ‘संवेदना’ या विशेष संगीत मैफलीमध्ये सहभागी होताना ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ अशीच या बुजुर्ग कलाकारांची भावना व्यक्त झाली. ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी दुष्काळग्रस्तांना लाखमोलाची मदत जाहीर केली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दुष्काळाने होरपळलेल्या बांधवांच्या मदतीसाठी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर ‘संवेदना’ या दोन सत्रातील विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे संकलित झालेला निधी मुख्यमंत्री दुष्काळ निधीला देण्यात येणार असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
कोकिळेचे कूजन आणि बासरीच्या स्वरांचे गुंजन अशा प्रसन्न वातावरणात सकाळी सहा वाजता पं. रोणू मुजुमदार यांच्या बासरीवादनाने ‘संवेदना’ मैफलीच्या पहिल्या सत्राची सुरुवात झाली. प्रारंभी ‘गुणकली’ आणि नंतर ‘अहिर भैरव’ या रागांची वैशिष्टय़े त्यांच्या वादनातून उलगडली. पं. रोणू मुजुमदार यांचे शिष्य कल्पेश यांनी बासरी सहवादनाची आणि रामदास पळसुले यांनी तबल्याची समर्पक साथ केली. ‘बिभास’ रागातील बंदिशीच्या सादरीकरणाने वादनाची सांगता करताना पं. रोणू मुजुमदार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
सकाळच्या प्रहरातील ‘तोडी’ या रागाचे सौंदर्य ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या रससिद्ध गायनातून उलगडले. त्यांना डॉ. अरिवद थत्ते यांनी संवादिनीची, रोहित मुजुमदार यांनी तबल्याची, वैष्णवी अवधानी आणि सौरभ नाईक यांनी तानपुऱ्याची साथसंगत केली. रसिकांच्या आग्रहास्तव ‘िहडोल’ रागगायनाने पं. कशाळकर यांच्या मैफलीची सांगता झाली. पं. राजन-साजन मिश्रा यांच्या बनारस घराण्याच्या गायनातून ‘जौनपुरी’ रागाचे सौंदर्य उलगडले. त्यांना डॉ. अरिवद थत्ते यांनी संवादिनीची, पं. अरिवदकुमार आझाद यांनी तबल्याची, मोहनकुमार दरेकर आणि मयूर महाजन यांनी तानपुऱ्याची साथसंगत केली. ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या ‘सूरसंगम’ चित्रपटातील भैरवी गीताने सकाळच्या सत्राची सांगता झाली.
डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या बहारदार व्हायोलिनवादनाने सायंकाळचे सत्र रंगले. कर्नाटकी संगीतातील ‘बहुधारी’ हा राग त्यांनी गायकी अंगाने फुलविला. पुत्र डॉ. अंबी सुब्रमण्यम यांनी व्हायोलिन सहवादनाची साथ केली. तर, सत्य साई (मोरसिंग), डी. एस. आर. मूर्ती (मृदंगम) त्रिपुरार पुरम राधाकृष्णन (घटम) यांनी त्यांना साथसंगत केली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या प्रतिभासंपन्न गायकीतून ‘केदार’ रागाचे सौंदर्य उलगडले. त्यांना तन्मय देवचके (संवादिनी), शंतनू शुक्ल (तबला) यांच्यासह नंदिनी बेडेकर आणि तेजश्री आमोणकर यांनी तानपुऱ्यासह गायनसाथ केली.
 
कलाकार मदत करणारच
आपल्या मैफलीतील ‘केदार’ रागगायनानंतर किशोरी आमोणकर यांनी दुष्काळ निधीसाठी एक लाख रुपये देण्याचे जाहीर करीत रसिकांशी संवाद साधला. आपलेच लोक, आपलेच नाते आणि आपलेच सरकार.. आपल्या हिंदूू संस्कृतीमध्ये, दोन घास असतील तर, एक दुसऱ्याला द्या आणि एक तुम्ही घ्या असे सांगतात. त्यामुळे आपत्तीच्या काळात आम्ही कलाकार मदत करणारच. सरकारही करतयं. पण, तुमच्या सगळ्यांनीसुद्धा मदत करायची गरज आहे. प्रत्येकाने दोन-दोन रुपये दिलेत तरी चालेल. पण, सगळ्यांनी मदत करा, असे आवाहन मी करते, अशा शब्दांत किशोरीताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.