पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांची चार पदे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या अंतर्गत इच्छुक उमेदवारांना १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठामध्ये मानव्यविज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे अधिष्ठाता पद आहे. आधीच्या अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर २०२३ मध्ये विद्यापीठाने अधिष्ठाता, नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ संचालक या पाच पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यापैकी नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ संचालक पदासाठी निवड करण्यात आली. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या १७ ऑगस्ट २०२२ च्या पत्रान्वये करून दिलेल्या आरक्षण निश्चितीनुसार प्रस्तावित पदभरती रद्द करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्राद्वारे दिले होते. त्यानुसार अधिष्ठात्यांच्या चार पदांसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सध्या प्रभारी पद्धतीने अधिष्ठाता पदाचे कामकाज करण्यात येत आहे. तसेच डॉ. महेश काकडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर डॉ. प्रभाकर देसाई प्रभारी परीक्षा संचालक म्हणून काम पाहत आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ७ ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय अकृषी विद्यापीठांतील घटनात्मक पदांवरील नियुक्तीसाठी नवे निकष निश्चित केले आहेत. त्यात शैक्षणिक पात्रता आणि मुलाखत यासाठी प्रत्येकी ५० गुण असे एकूण १०० गुण ठरवण्यात आले आहेत. तसेच या नव्या निकषांच्या आधारे विद्यापीठांतील सांविधानिक पदांसाठीची निवड प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिली. त्यामुळे अधिष्ठात्यांसह सांविधानिक पदांच्या भरतीचा मार्ग खुला झाला. या पार्श्वभूमीवर आता अधिष्ठाता पदासाठीची भरती प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार चार पदांपैकी एक पद इतर मागास वर्ग (ओबीसी), एक पद अनुसूचित जाती (एससी), एक पद विमुक्त जाती (अ) यांच्यासाठी राखीव असून, एक पद अराखीव आहे. तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदासाठीचीही जाहिरात विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यापीठातील चार विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक या पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ