पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे घेण्यात आलेल्या चाळीसाव्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदा या परीक्षेचा निकाल ६.६९ टक्के लागला असून, ६ हजार ५० उमेदवार पात्र ठरले आहेत. विद्यापीठाच्या सेट विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाविद्यालय, विद्यापीठांत सहायक प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा पात्र असणे अनिवार्य आहे.
विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा सेट परीक्षेची समन्वयक संस्था आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यासाठीची सेट परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे. त्यानुसार १५ जून रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे, तसेच गुणपत्रक डाऊनलोड करून घेता येणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार महाराष्ट्र, गोव्यातील १८ शहरांमधील २५६ महाविद्यालयात परीक्षा घेण्यात आली. यंदा या परीक्षेसाठी १ लाख १० हजार ४१२ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यापैकी ९० हजार ३६६ उमेदवारांनी परीक्षा दिली. यावर्षी ६ हजार ५० उमेदवार पात्र ठरले आहेत.