दोन वर्षांनंतर होणारा महोत्सव पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दीला समर्पित

पुणे : अभिजात संगीताच्या क्षेत्रात जगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा आनंद करोना निर्बंधाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत संगीतप्रेमींना अनुभवता येणार आहे. दिग्गज कलाकारांसह उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दीला समर्पित करण्यात येणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे पाच दिवस संगीतप्रेमींना स्वरानंद देणारा हा महोत्सव रंगणार आहे.

करोना काळात पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात साजरी करता आली नाही. मात्र, यंदाच्या महोत्सवात ती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या किराणा घराण्याच्या गायकांचा विशेष सहभाग हे महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल. तसेच महोत्सवाशी दीर्घकाळ संबंधित असलेले मात्र नजीकच्या काळात स्वर्गवासी झालेल्या कलाकारांचे कुटुंबीय व शिष्यांना महोत्सवात सहभागी करून घेत, मंडळ त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, प्रभाकर देशपांडे आणि पृथ्वी एडीफिसचे अभय केले या वेळी उपस्थित होते.

दिल्ली येथील किराणा घराण्याचे गायक अविनाश कुमार, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे पुत्र उस्ताद आलम खाँ, कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस, ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांच्या शिष्या यशस्वी सरपोतदार, ‘श्रीवल्ली’फेम गायक सिड श्रीराम, बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना आणि अमेरिकेतील कर्नाटक शैलीतील गायक संदीप नारायण हे यंदा या स्वरमंचावरून पहिल्यांदाच आपली कला सादर करणार आहेत. अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचा कथ्थक नृत्याविष्कार होणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.

महोत्सवातील कार्यक्रम

दिवस पहिला (१४ डिसेंबर – दुपारी ४)

– पं. उपेंद्र भट (गायन)

– शाश्वती मंडल (गायन)

– पं. रतनमोहन शर्मा (गायन)

– उस्ताद अमजद अली खाँ (सरोदवादन)

दिवस दुसरा (१५ डिसेंबर – दुपारी ४)

– अविनाश कुमार (गायन)

– उस्ताद आलम खाँ (सरोदवादन)

– पं. साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा (सहगायन)

– डाॅ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी शंकर, नंदिनी शंकर (व्हायोलिनवादन)

दिवस तिसरा (१६ डिसेंबर – दुपारी ४)

– मनाली बोस (गायन)

– राहुल शर्मा (संतूरवादन)

– श्रीनिवास जोशी (गायन)

– पं. अजय चक्रवर्ती (गायन)

दिवस चौथा (१७ डिसेंबर – दुपारी ३)

– यशस्वी सरपोतदार (गायन)

– उमाकांत गुंदेचा व अनंत गुंदेचा (धृपदगायन)

– भारती प्रताप (गायन)

– विराज जोशी (गायन)

– सिड श्रीराम (कर्नाटक शैलीतील गायन)

– उस्ताद रशीद खाँ व उस्ताद शाहीद परवेज (गायन-सतार जुगलबंदी)

दिवस पाचवा (१८ डिसेंबर – दुपारी १२)

– आनंद भाटे (गायन)

– राजेंद्र प्रसन्ना (बासरीवादन)

– राजेंद्र कंदलगावकर (गायन)

– महेश काळे व संदीप नारायण (हिंदुस्थानी-कर्नाटक संगीत गायन जुगलबंदी)

– अर्चना जोगळेकर (कथ्थक नृत्य)

– डाॅ. प्रभा अत्रे (गायन)