पुणे : राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थी समूह स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात अभ्यासक्रमातील विषय, छंद, पर्यावरण, स्पर्धा परीक्षा, वाचन, व्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध ३४ समूहांचा समावेश असून, विद्यार्थी समूह स्थापन करण्यामागे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, अंगभूत कौशल्याला, कल्पकतेला, चिकित्सक वृृत्तीला चालना देण्याचा उद्देश आहे. शाळांना १५ सप्टेंबरपर्यंत समूह स्थापनेचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी याबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे राज्यातील उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, जिल्हा परिषदांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिले आहेत. पहिली ते बारावीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी समूह स्थापनेबाबत ‘एससीईआरटी’ने विद्यार्थी समूह मार्गदर्शिका ही पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’, ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’मधील मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण ३४ समूह निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार समूहांची स्थापना करून त्यांचे कार्यान्वयन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थी समूहांची शाळांमध्ये सुयोग्य स्थापना, कार्यान्वयन, जिल्ह्यातील विविध स्तरांवर योग्य समन्वयन व्हावे यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक यांची जबाबदारीही निश्चित करून देण्यात आली आहे.

‘विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्य तितके विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांची आवड आणि कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ताण येऊ न देता १५ सप्टेंबरपर्यंत स्थापन करावेत, प्रत्येक विद्यार्थी किमान एका समूहात समाविष्ट असेल, याची खात्री करावी, निश्चित केलेल्या ३४ समूहांव्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असल्यास आधी तो ३४ समूहांमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही, याची शाळास्तरावरच खात्री करावी आणि त्यानंतरच तो नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा, नवीन विद्यार्थी समूहासाठी पुस्तिकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, त्याची एक प्रत ‘डाएट’ला माहितीस्तव पाठवावी, त्यावर ‘डाएट’ने योग्य तो अभिप्राय शाळेला द्यावा, ‘डाएट’ने प्राप्त प्रस्ताव ‘एससीईआरटी’ला आवश्यक त्या दुरुस्त्यांसह पाठवावेत, तसेच ‘डाएट’ने एक अधिव्याख्याता यांची समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करून सर्व शाळांना त्याबाबत कळवावे,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे विद्यार्थी समूह संकल्पना?

‘समान आवड, कल असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकमेकांकडून शिकावे, ही विद्यार्थी समूहाची संकल्पना आहे. पूर्वीही असा उपक्रम अस्तित्वात होता. आता ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’नुसार त्यात काही बदल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असलेले विद्यार्थी एकापेक्षा जास्त समूहांमध्येही सहभागी होऊ शकतात,’ असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले.