‘शेडय़ुल एच वन’मध्ये येणाऱ्या औषधांच्या खरेदी-विक्रीची स्वतंत्र नोंद ठेवणे यापुढे औषधविक्रेत्यांना बंधनकारक केले जाणार असून या नव्या नियमाची अंमलबजावणी १ मार्चपासून सुरू केली जाईल. या खरेदी-विक्रीचे लेखापरीक्षणही होणार आहे, अशी माहिती अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी शनिवार दिली. उच्च क्षमतेची प्रतिजैविके, झोपेसाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या, नशेसाठी वापरली जाणारी औषधे आदींचा समावेश शेडय़ुल एच वनमध्ये होतो.
अन्न व औषध विभागाच्या विविध कायद्यांची अंमलबजावणी तसेच नव्या नियमांची माहिती शहरातील औषध विक्रेत्यांना देण्यासाठी शनिवारी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात झगडे यांनी ही माहिती दिली. झोपेसाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्यांसह विविध आजारांमध्ये दिल्या जाणाऱ्या गोळ्या, औषधे, प्रतिजैविके आदींवर नियंत्रण आणण्यात आले आहे. डॉक्टरांनी ही औषधे लिहून दिली असतील, तरच त्यांचा वापर करता येतो. सेहेचाळीस औषधांची ही यादी असून त्यांच्या खरेदी-विक्रीची स्वतंत्र नोंद यापुढे विक्रेत्यांना ठेवावी लागेल. ही प्रक्रिया १ मार्चपासून सुरू केली जाईल. या प्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या संमतीशिवाय जर या औषधांची विक्री झाली असेल, तर ते समजून येईल, असे झगडे यांनी यावेळी सांगितले.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे द्यायची नसल्यामुळे यादीतील औषधांचा वापर नेमका कोणत्या डॉक्टरांकडून होतो, तेही स्पष्ट होणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या सेहेचाळीस औषधांची विक्री करताना संबंधित औषध कोणत्या रुग्णाला दिले, ते किती प्रमाणात दिले, त्यासाठी कोणत्या डॉक्टरने चिठ्ठी दिली होती याची संपूर्ण माहिती औषध विक्रेत्यांना ठेवावी लागेल. तसेच ही माहिती असलेली कागदपत्रे (रेकॉर्ड) पुढील तीन वर्षे ठेवावी लागतील, असेही झगडे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
औषधविक्रेत्यांना एक मार्चपासून विक्रीची माहिती ठेवावी लागणार
‘शेडय़ुल एच वन’मध्ये येणाऱ्या औषधांच्या खरेदी-विक्रीची स्वतंत्र नोंद ठेवणे यापुढे औषधविक्रेत्यांना बंधनकारक केले जाणार असून या नव्या नियमाची अंमलबजावणी १ मार्चपासून सुरू केली जाईल.
First published on: 02-02-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schedule h1 medical sale purchase register