समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना वस्तुरूपी देणगी प्रदान करून लायन्स क्लब आणि केएसबी केअर चॅरिटेबल ट्रस्टने सरत्या वर्षांला निरोप दिला.
वंचित विकास संचलित नीहार घरकुलातील मुलांसाठी केएसबी पंप कंपनीच्या केएसबी केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्कूल बस भेट देण्यात आली. लोहगाव येथील नीहार घरकुलापासून प्राथमिक शाळा दीड किलोमीटर अंतरावर, तर माध्यमिक शाळा तीन किलोमीटर अंतरावर आहे. संस्थेला स्कूल बस मिळाल्यामुळे मुलांना शाळेत ने-आण करणे आता सोयीचे झाले आहे.
केएसबीचे संचालक शिरीष कुलकर्णी, सुधीर आफळे, किरण शुक्ल, स्मिता खेडेकर यांच्या उपस्थितीत नीहार संस्थेस स्कूल बस प्रदान करण्यात आली. वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर आणि संचालिका सुनीता जोगळेकर या वेळी उपस्थित होत्या. संस्थेमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुला-मुलींचे गेली २५ वर्षे पुनर्वसन केले जात आहे. सध्या संस्थेमध्ये ६५ मुले-मुली असून, यापूर्वी ८४ मुला-मुलींचे यशस्वी पुनर्वसन झाले आहे.
देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांचे संगोपन करण्याबरोबरच एचआयव्हीबाधित महिलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या स्नेहालय संस्थेतील मुलांना लायन्स क्लबतर्फे कपडेवाटप करण्यात आले. त्याचबरोबर बचतगटातील महिलांना १५ शिलाई मशीन देण्यात आली. जागतिक लायन्स क्लबने शंभराव्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल लायन्स क्लब ३२३ डी २ रिजनतर्फे ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना लायन्स गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. प्रबोधिनी बावस्कर, लायन्सचे प्रांतपाल श्रीकांत सोनी, चंद्रहास शेट्टी, राजेंद्र गोयल, गिरीश मालपाणी, अनिल बधे, आशा ओसवाल, चंद्रशेखर सोनावळे, शैलेश शहा या वेळी उपस्थित होते.
समाजामध्ये काही जण असामान्य काम करीत आहेत. त्यांच्या मदत करण्याच्या वृत्तीने देश अद्याप सुरळीत चालला आहे. मदत करण्याबरोबरच आत्मसन्मान जागृत करायला हवा, असे मत स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आजही देशात अनेक ठिकाणी आवश्यक प्राथमिक आरोग्याच्या सोयी नाहीत. रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षाही रोग होऊच नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. ग्रामीण भागातील आरोग्याच्या जनजागृतीसाठी लायन्स क्लबने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2015 रोजी प्रकाशित
सामाजिक संस्थांना वस्तुरूपी देणगी प्रदान करून सरत्या वर्षांला निरोप
वंचित विकास संचलित नीहार घरकुलातील मुलांसाठी केएसबी पंप कंपनीच्या केएसबी केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्कूल बस भेट देण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-12-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bus by ksb care charitable trust to nihar gharkool