पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून राज्यातील सर्व महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र प्रथम वर्षासाठी प्रवेश नोंदणी कमी होऊन जागा रिक्त राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मुळे होणारे बदल, प्रथम वर्षाचे प्रवेश वाढवण्यासाठी आता महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे . राज्यातील तंत्रनिकेतनांमधील प्रवेश वाढवण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व रोजगारसंधी याबाबतची माहिती स्कूल कनेक्ट हे अभियानद्वारे गेली काही वर्षे देण्यात येत आहे. त्यामुळे तंत्रनिकेतनांमधील प्रवेश वाढल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, संलग्न महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रम याबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्कूल कनेक्ट हे अभियान महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियनाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ स्तरावर प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून अभियानपूर्व कार्यशाळा घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांपैकी योग्य महाविद्यालयांची संपर्क अभियान कार्यशाळेच्या संयोजनासाठी निवड करून तीन-चार महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना कार्यशाळेसाठी पाचारण करावे, तसेच कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक, इ मेल आयडी संकलित करून त्या विद्यार्थ्यांना परिसर सहल घडवावी. त्यात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, संस्थेची माहिती, पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती याबाबत माहिती देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यासाठी अभियान राबवून विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम, कार्यप्रशिक्षण, एकात्मिक अभ्यासक्रम पीएच.डी. या बाबत माहिती देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
स्कूल कनेक्ट अभियानाची वैशिष्ट्ये…
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील विद्यार्थी हितकारक बदल, परिणामांविषयी विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन करणे
- विद्यापीठांच्या बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमांची माहिती देणे
- श्रेयांक पद्धती आणि त्यातील लवचिकतेबाबत मार्गदर्शन करणे
- शिक्षण अर्धवट सोडून रोजगाराकडे वळलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षणाविषयी माहिती देऊन शिक्षण प्रवाहात आणणे
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थी सहायता कक्ष, सर्वांगीण विकासाबाबतच्या संधींविषयी माहिती देणे