पुणे : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आणि शाळांची गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे. गुणवत्तेसोबत भौतिक बाबी पुरविण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत ४०३ शाळा आदर्श करण्यात येणार आहेत.
आदर्श शाळा करण्यासाठी शिक्षकांचे कौशल्य त्रुटी शोधण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात या उपक्रमासाठी निवडण्यात आलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या पाठाचे सादरीकरण शाळास्तरावर केंद्रप्रमुख आणि विषय शिक्षक यांच्याद्वारे घेण्यात आले. हे पाठ निरीक्षण ६० गुणांसाठी ठेवण्यात आले होते. शाळांची निवड करताना शाळेमध्ये १५० पटसंख्येचा निकष लावला होता. या शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षण गरजा निश्चितीसाठी आशयज्ञान, अध्यापन शास्त्रीय कौशल्य, मानसशास्त्रीय व अध्यापकीय दृष्टिकोन या घटकांवर आधारित भाषा, गणित, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या विषयांवर आधारित चाळीस गुणांची बहुपर्यायी ऑनलाइन चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये ३३३० शिक्षकांपैकी २४४० शिक्षक ऑनलाइन चाचणी पूर्ण करू शकले. इतर ८९० शिक्षक तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन चाचणी पूर्ण करू शकले नाहीत.
ऑनलाइन प्रशिक्षण
शिक्षकांच्या ऑनलाइन चाचणीवरून कौशल्य त्रुटी निश्चित करण्यात आल्या. यातील काही शिक्षकांना क्षमता संवर्धनासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यामुळे या शिक्षकांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.