पुणे : विविध संघटनांनी मंगळवारी (१३ डिसेंबर) पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळा नेहमीप्रमाणे नियमित भरणार असल्याची स्पष्टोक्ती केली आहे. शाळा बंद ठेवण्याबाबत कोणत्याही प्रकारचे आदेश प्रसृत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच मंगळवारी पुणे, पिंपरी-चिंचवडसह उर्वरित जिल्ह्यातील शाळा भरतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने मंगळवारी बंद पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू राहणार किंवा कसे, याबाबत प्रशासनाने सायंकाळी स्पष्टोक्ती केली. विविध संघटनांनी बंद पुकारला असला, तरी शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सूचना, आदेश प्रसृत करण्यात आलेले नाहीत. नेहमीप्रमाणेच शाळा, महाविद्यालये नियमित सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.