* ‘शालेय प्रकल्पग्रस्त’ पालकांना दिलासा
* प्रकल्पाच्या वह्य़ा लिहून देण्याचा नवा व्यवसाय
‘लिखाणाचा कंटाळा आलाय.. सर्व इयत्तांच्या, सर्व माध्यमांच्या आणि बोर्डाच्या शाळेच्या प्रकल्प वह्य़ा लिहून दिल्या जातील..’ ही कोणतीही पुणेरी पाटी किंवा विनोद नाही. सुट्टय़ांमध्ये मुलांच्या प्रकल्प वह्य़ा पूर्ण करण्याच्या चिंतेत असलेल्या अशा ‘प्रकल्पग्रस्त’ पालकांना दिलासा देणाऱ्या या जाहिराती सध्या शहरात ठिकठिकाणी लागल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्यावर्षीचे शाळांचे प्रकल्प अनेकांनी ‘ओएलएक्स’वर विकायलाही काढले आहेत. बाजारपेठाही तयार प्रकल्पांनी भरून गेल्या आहेत.
शाळांची दिवाळीची सुट्टी जवळ आली आहे. फटाके, कपटे, दागिने, सजावटीचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या यांनी बाजारपेठ भरायला सुरुवात झाली आहे. मात्र शालेय शैक्षणिक साहित्याच्या बाजारपेठेतील गर्दीही कमी झालेली नाही. शालेय विषयांच्या तयार प्रकल्पांनी ही बाजारपेठही भरून गेली आहे. ‘कृतिशील’ शिक्षण देण्याची जाहिरात प्रत्यक्षात आणण्यासाठी शाळांकडून विविध विषयाचे प्रकल्प मुलांना दिले जातात. बहुतेक करून दिवाळीच्या सुट्टीत हे प्रकल्प पूर्ण करून द्यायचे असतात. त्यामध्ये अगदी स्वातंत्र्य युद्धातील सगळ्या नेत्यांची छायाचित्रे जमवून चिकटवही करा, एखाद्या वैज्ञानिकावर प्रत्येकाने हस्तलिखित काढा, जगातील सर्व देशांच्या चलनांची माहिती गोळा करा, दहा वैज्ञानिक प्रयोगाच्या कृती लिहून काढा, तक्ते करा असे प्रकल्प दिले जातात. त्याबरोबर माहिती तंत्रज्ञान, निबंध, प्रयोगवही, संगीत, कार्यानुभव, योग, शारीरिक शिक्षण, पर्यावरण, मूल्यशिक्षण अशा विषयांच्या वह्य़ा पूर्ण करून देण्याचा गृहपाठ दिवाळीच्या सुट्टीसाठी दिला जातो. आपली नोकरी सांभाळून आणि रात्रंदिवस जागून मुलांच्या बरोबरीने हे प्रकल्प आणि वह्य़ा पूर्ण करण्याची पालकांना भेडसावणारी चिंता काही ‘हुशार’ व्यावसायिकांनी हेरली आहे. प्रकल्प वह्य़ा लिहून देण्याचाच व्यवसाय आता त्यांनी सुरू केला आहे.
आर्थिक मोबदला घेऊन मुलांच्या प्रकल्प वह्य़ा पूर्ण करून दिल्या जातात. ‘लिखाणाचा कंटाळा आलाय.. प्रकल्पांची जबाबदारी आमच्यावर सोपवा..,’ ‘सर्व इयत्तांचे, माध्यमांचे, सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांच्या प्रकल्पांच्या लिखाणाचे काम पूर्ण करून दिले जाईल,’ अशी जाहिरातबाजीही या व्यावसायिकांनी सुरू केली आहे. त्याचबरोबर काही खासगी शिकवणी वर्गातही अधिकचे शुल्क घेऊन प्रकल्प पूर्ण करून देण्यात येतात. बाजारात तर तयार प्रकल्पांचे भरपूर पर्याय आहेत. शाळा आणि प्रकल्प सांगितला की जाणकार दुकानदार योग्य प्रकल्प आणि शाळेत तो मान्य होत असल्याची हमीही देतात. ‘ओएलएक्स, क्विकर’ सारख्या संकेतस्थळांवर प्रकल्प पूर्ण करून देणाऱ्यांच्या आणि तयार प्रकल्पांची विक्री करणाऱ्यांच्या जाहिराती झळकत आहेत. काहींनी तर आदल्या वर्षी तयार केलेले प्रकल्प विकण्याची जाहिरातही या संकेतस्थळांवर केली आहे.
अॅप्सचाही बाजार
वेगवेगळ्या विषयांचे प्रकल्प कसे करावेत, त्यासाठी नव्या कल्पना सुचवणारी अनेक मोबाईल अॅप्सही सध्या उपलब्ध आहेत. छोटय़ा वैज्ञानिक प्रयोगांच्या कृती, ते करण्यासाठीच्या काही टिप्स, हस्तकला, कार्यानुभावाचे वेगवेगळे प्रकार त्याच्या कृती पुरवणारी अनेक अॅप्स सध्या आहेत. मात्र ही अॅप्स डाऊनलोड केली तरीही प्रत्यक्ष कृती मात्र विद्यार्थी किंवा पालकांनाच करावी लागते. त्यावर तयार प्रकल्पांनी पर्याय दिला आहे.