पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (२१ एप्रिल) सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील बहुतांश सर्वच भागांमध्ये उन्हाचा चटका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या सुटीसंदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनपासून आणि त्या दिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जूनपासून आणि त्या दिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील असे नमूद करण्यात आले आहे.