चिन्मय पाटणकर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानांतर्गत आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी, ७३ विज्ञान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्याच्या उद्देशाने या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, नामांकित शाळा योजनेअंतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी २५० आश्रमशाळांची आदर्श आश्रमशाळा म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता आदर्श शाळांमध्ये आधुनिक सुविधांसह विज्ञान केंद्रांचीही उभारणी केली जाणार आहे.

हेही वाचा >>> मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य; छगन भुजबळ यांना कायदेशीर नोटीस

 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानातील महत्वाच्या विषयांबाबत माहिती देण्यासाठी आश्रमशाळांमध्ये अंतराळविषयक बाबी, यंत्रशाळा, टेलिस्कोप आदींची उभारणी केली जाईल. आवश्यकतेनुसार याबाबत तज्ज्ञ सल्लागारांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना अंतराळाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येईल. विज्ञान केंद्र उभारण्याचे काम सुरू झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल.

हेही वाचा >>> शिक्षक भरतीसाठी २३ जिल्ह्यांतील रिक्त पदांची जाहिरात लवकरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याप्रमाणे शिक्षकांनी मार्गदर्शन करण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत सहा महिन्यांनी मूल्यांकन करण्यात येणार आहे. आयुक्तांना दह महिन्याला प्रगती अहवाल सादर करावा लागेल. आश्रमशाळांतील पायाभूत सोयीसुविधा, जागेची उपलब्धता विचारात घेऊन ७३ विज्ञान केंद्र उभारण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी आराखडा तयार करून त्यास संबंधित विभागाची मान्यता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. ही योजना एक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.