वाळवंट, समुद्र, पश्चिम घाट, वन्यजीवन व जैवविविधतेचे विविध पैलू जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या पुणेकरांना एक चांगली संधी सध्या उपलब्ध झाली आहे.. जैवविविधता व पर्यावरणाची उपयुक्त माहिती घेऊन धावणारी ‘सायन्स एक्स्प्रेस’ आता पुण्यात आली आहे. खडकीच्या रेल्वे स्थानकावर या एक्स्प्रेसमधील प्रदर्शनाची बुधवारी सुरुवात करण्यात आली. २० डिसेंबपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी मोफत खुले आहे.
जैवविविधतेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या विज्ञान व वन विभागाच्या वतीने सायन्स एक्स्प्रेसची संकल्पना साकारण्यात आली आहे. रेल्वे विभागाच्या नियंत्रणाखाली देशाच्या विविध भागांमध्ये ही एक्स्प्रेस जात आहे. देशातील ५७ रेल्वे स्थानकांमध्ये ही एक्स्प्रेस जाणार असून, आजवर तिने ४२ स्थानकांचा प्रवास पूर्ण केला आहे. या अनोख्या एक्स्प्रेसला एकूण १६ डबे असून, त्यातील ११ डब्यांमध्ये जैवविविधतेची माहिती आहे. इतर तीन डब्यांमध्ये पर्यावरणासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्प्रेसमध्ये स्वतंत्र बाल विभाग तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मुलांना विज्ञान व गणिताची माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे एक्स्प्रेसमधील प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधीही मिळते आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचाही त्यात समावेश आहे. बुधवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत एक्स्प्रेसमधील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सायन्स एक्स्प्रेस पाहण्यासाठी
खडकी स्थानकावर आलेली सायन्स एक्स्प्रेस तिसऱ्या फलाटावर उभी करण्यात आली आहे. तेथे पोहोचण्यासाठी व पार्किंगसाठी स्थानकाच्या पश्चिमेकडील (औंध रस्ता) प्रवेशद्वाराचा उपयोग करावा. शाळा किंवा मोठय़ा गटाने प्रदर्शन पाहण्याची इच्छा असल्यास ९४२८४०५४०८ या मोबाइल क्रमांकावर प्रदर्शनाच्या संयोजन समितीशी संपर्क साधावा. सायन्स एक्स्प्रेसच्या अधिक माहितीसाठी http://www.sciencexpress.in या संकेतस्थळाला भेट द्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science express railway bio exhibition
First published on: 18-12-2014 at 03:15 IST