पुणे : विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच होणार असल्याने पालकांनी आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

हेही वाचा >>> पुणे: आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने टँकर व्यावसायिकाकडे मागितली पाच हजारांची लाच

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. खासगी शाळांतील प्रत्येक उपक्रमात पालकांना आर्थिकदृष्ट्या सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. खासगी शाळांमध्ये शिकवले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये. या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. पालकांनीही आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा. खासगी प्राथमिक शिक्षणाला शक्य तेवढी शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पूर्वप्राथमिक शाळा आता कायद्याच्या कक्षेत आल्या आहेत. त्या संदर्भात केसरकर म्हणाले, की पूर्वप्राथमिक शाळांना सरकारी परवानगी आणि त्यांच्यावरील नियमनासाठी कडक निर्बंध लादले जाणार आहेत.

हेही वाचा >>> मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी…जागावाटपाबाबत दीपक केसरकर काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर शिक्षक भरती राज्यात शिक्षकांच्या तीस हजार रिक्त पदांवर शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली आहे. अभियोग्यता चाचणीचा निकालही जाहीर झाला आहे. त्यामुळे आता उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतीक्षा आहे. या बाबत केसरकर म्हणाले, की प्राथमिक शिक्षकांच्या भरती संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक भरतीला ५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. ती उठल्यावर तातडीने शिक्षक भरती पूर्ण केली जाईल. राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेला शिक्षक मिळणार आहे.