व्यंगचित्र म्हणजे राजकीय टीकाचित्र असाच अनेकांचा गैरसमज आहे. निखळ आनंद देण्याबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक विषय मांडण्यासाठी हे माध्यम हाताळण्याचा प्रयत्न मी केला. चित्र पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर झळकलेले स्मितहास्य हाच माझ्या कृतार्थतेचा आनंद आहे. सुरुवातीला ही पाऊलवाट होती,पण आता नव्या पिढीतील काही व्यंगचित्रकार हे केवळ राजकीय टीकाचित्रांपुरतेच मर्यादित न राहता वेगवेगळे विषय चित्रांतून मांडत असल्याने हा रस्ता प्रशस्त होत आहे. एका अर्थाने व्यंगचित्राचा कॅनव्हास मोठा झालायं.. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी मंगळवारी ही भावना व्यक्त केली.
व्यंगचित्रांच्या माध्यमातून गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ निखळ आनंद वाटणारे शि. द. फडणीस यांनी वयाच्या ९० व्या वर्षांत पदार्पण केले. निळा शर्ट, निळ्या गडद रंगाचे जॅकेट आणि सोनेरी काडीच्या चष्म्यातून झळकणाऱ्या मिश्किल स्वभावासह प्रसन्न मुद्रेने फडणीस यांनी व्यंगचित्रकलेविषयी मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. सतत खणाणणारा दूरध्वनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. पलीकडून मिळणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत फडणीस प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून फडणीस यांचे अभीष्टचिंतन केले.
शंकर, आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे माझे आवडते राजकीय टीका चितारणारे व्यंगचित्रकार. केवळ व्यंगचित्र चितारुनच बाळासाहेब थांबले नाहीत, तर ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय पक्ष जन्माला घातला. मी राजकारणाबाहेरचे दुसरे जग पाहिले. सुरुवातीच्या काळात ‘सोबत’, ‘माणूस’ यांच्यासाठी मी राजकीय टीकाचित्रं केली खरी, पण त्यामध्येच कारकीर्द घडवावी असे कधी वाटले नाही. एक तर त्यासाठीची धावपळ मला शक्य नव्हती आणि कलाकृती साकारण्यासाठी म्हणून मिळणारा निवांतपणा हादेखील अनुभवायचा होता, असे सांगून फडणीस म्हणाले, व्यंगचित्रांमध्ये मी शब्द वापरत नाही. शब्दविरहित चित्रांमुळेच मी राज्याबाहेर पोहोचू शकलो असे वाटते. रेषेच्या आकारामधील ताकद हेच व्यंगचित्रांचे बलस्थान आहे. कोणत्याही गायकाला शास्त्रीय संगीताची बैठक असावी लागते. त्याप्रमाणेच व्यंगचित्रकारासाठी चित्रकलेचा पाया भक्कम असावा लागतो. या हस्तकलेची वाट चित्रकलेतूनच जाते.
शब्दांपेक्षा चित्राचा वेग अधिक असतो. या सामर्थ्यांची जाण असल्यामुळेच आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर टीका करण्यासाठी लेखणीबरोबरच कुंचला हाती घेतला. निरक्षरापर्यंतही चित्र झटकन पोहोचते, ही या माध्यमाची ताकद आहे. त्याची प्रचिती मी अनेकदा घेतली आहे. शंवाकि (शं. वा. किर्लोस्कर) हे संपादक असूनही व्यंगचित्र काढण्यामध्ये धन्यता मानत. दीनानाथ दलाल, शंकर आणि मारिओ मिरांडा हे माझे आवडते कलाकार होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणाचे अनुकरण करावेसे वाटले नाही. व्यंगचित्रांमध्ये अडकून पडल्याने चित्रकला आणि निसर्गचित्रकला यासाठी वेळ देता आला नाही. कलेची दृष्टी, कल्पकतेचे सृजन कलाकाराजवळ हवेच. संगणक हा ‘मॅजिक ब्रश’ आहे, असेही फडणीस यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sd phadnis cartoon canvas magic brush
First published on: 30-07-2014 at 03:20 IST