पुणे : कंपन्यांचा सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी अनेकदा योग्य सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सीएसआर निधीचा योग्य आणि परिणामकारक वापर व्हावा, यासाठी ‘सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे’ अर्थात ‘सीप’ने पुढाकार घेतला आहे. कंपन्यांना योग्य संस्था आणि योग्य उपक्रमांसाठी जोडून देण्याच्या उद्देशाने ‘एन्व्हायर्न्मेंटल सोशल गव्हर्नन्स’ म्हणजेच ‘ईएसजी फोरम’ या मंचाची निर्मिती ‘सीप’तर्फे करण्यात आली आहे.
‘ईएसजी फोरम’च्या संकल्पनेबद्दल ‘सीप’च्या अध्यक्षा विनिता गेरा म्हणाल्या, ‘गेली अनेक वर्षे पुण्यातील सॉफ्टवेअर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासोबतच संघटित ठेवण्यासाठी ‘सीप’ कार्यरत आहे. नेतृत्त्व, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि कार्य गुणवत्ता या चार महत्त्वाच्या विभागात ‘सीप’ प्रामुख्याने काम करत आहे. ‘सीप’तर्फे यापुढे सीएसआर उपक्रमासाठी एक शाश्वत व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीने येत्या काळात पर्यावरणीय सामाजिक प्रशासन अर्थात ‘एन्व्हायर्न्मेंटल सोशल गव्हर्नन्स’ – ईएसजी या विषयावरही काम करण्यात येईल. त्यामुळे सीएसआर निधी योग्य ठिकाणी पोहोचून चांगल्या पद्धतीने सामाजिक कामे होण्यास हातभार लागेल.’
‘शहरासमोर असलेली सामाजिक आव्हाने ओळखणे, ती समजून घेऊन त्यावर शाश्वत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ‘सीप’चा हा मंच पुढील काळात महत्त्वपूर्ण ठरेल. त्यात शहरातील पर्यावरण, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्था, वाहतूककोंडी, झोपडपट्ट्यांशी संबंधित प्रश्न, अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रश्न, आर्थिक दुर्बल घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आदींचा समावेश असेल,’ असे ‘सीप’चे सचिव आणि या मंचाचे समन्वयक विद्याधर पुरंदरे यांनी सांगितले.
‘ईएसजी फोरम’अंतर्गत उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींना एक हक्काचा मंच मिळेल. याद्वारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली एक शाश्वत परिसंस्था तयार होण्यासोबतच शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील. याचबरोबर शहरासाठी आवश्यक सामाजिक प्रकल्पही मोठ्या प्रमाणात सुरू होतील. विद्याधर पुरंदरे, समन्वयक, ईएसजी फोरम