दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानच्या काही भागातून नैर्ऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरल्याने पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण उत्तरेतून पाऊस माघारी येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, ३० सप्टेंबरला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये मोसमी पावसाने शेवटच्या टप्प्यामध्ये जोरदार हजेरी लावली होती. सद्य:स्थितीत बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान निर्माण होऊन पाऊस माघारी फिरतो आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम राजस्थानात कोरडे हवामान आहे. राजस्थानचा काही भाग, कच्छ, उत्तर अरबी समुद्र आदी भागातून २९ सप्टेंबरला मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. त्याचप्रमाणे राज्यस्थानातील उर्वरित भागासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात आणि उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून येत्या दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस माघारी फिरेल. संपूर्ण राजस्थानमधून मोसमी पाऊस माघारी फिरल्यानंतर साधारणत: सात ते दहा दिवसांत महाराष्ट्राच्या बहुतांश भागातूनही मोसमी पाऊस माघारी जातो, असे हवामान शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान राज्यातून पाऊस माघारी जाईल, अशी शक्यता आहे.

दरम्यान, सध्या दक्षिण किनारपट्टी ते दक्षिण बंगालच्या उपसागराच्या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणामध्ये ३० सप्टेंबरला दुपारनंतर वादळी पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असणार आहे.

मराठवाडय़ात सर्वात कमी पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ ते २९ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला असून, ९ टक्के पाऊस कमी आहे. राज्यामध्ये कोकणात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस आजवर पडला आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण काहीसे कमी असून, या भागात सरासरीपेक्षा आठ टक्के कमी म्हणजेच ९२ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण ९३ टक्के आहे. मराठवाडय़ात मात्र सर्वात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी सरासरीपेक्षा तब्बल २० टक्के कमी म्हणजे केवळ ८० टक्केच पाऊस पडला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seasonal rain fall back on
First published on: 30-09-2018 at 01:50 IST