निवडणुकीत स्वत:चे श्रम व पैसा घालून आपल्या उमेदवाराचे मनापासून काम करणारे खरे कार्यकर्ते केव्हाच संपले आहेत. आता प्रचारातील सर्व गोष्टी पगारी माणसे ठेवून केल्या जातात. सभांसाठी रितसर पैसे मोजून माणसे आणली जातात. हे काही आता नवीन राहिले नाही, पण पैसे देऊनही ‘कार्यकर्ते’ चोख काम करतील की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे काही उमेदवारांकडून निवडणूक प्रचारातील काही कामांसाठी महिला बचत गटांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे या बचत गटांना ‘निवडणूक रोजगार’ उपलब्ध झाला आहे.
एखादा उमेदवार निवडणुकीला उभा राहिला की कोण कुठले काम करणार, हे ठरलेले असायचे. प्रत्येक जण प्रामाणिकपणे आपापली भूमिका बजावित असत. अगदी रात्रभर जागून पोस्टर चिकटविण्यापासून सभेनंतर सतरंज्या किंवा खुच्र्या उचलणारे कार्यकर्ते होते. त्यासाठी ते कोणताही मोबदला घेत नव्हते. आपला पक्ष व आपला उमेदवार, हाच या कार्यकर्त्यांचा मोबदला होता. दिवसभरात चहा किंवा भेळ पार्टी इतकाच काय तो श्रमपरिहार त्यांना मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले. निवडणूकही एक इव्हेन्ट झाला. तो इव्हेन्ट साजरा करून देणाऱ्या वेगवेगळ्या संस्था तयार झाल्या व प्रत्येक कामाचे दरपत्रकही तयार झाले.
कोणताही मोबदला न घेता केवळ निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आता मिळत नाही. त्यामुळे निवडणुकीतील सर्वच कामांसाठी आता काही तरी मोबदला द्यावाच लागतो. या कार्यकर्त्यांचा संध्याकाळच्या श्रमपरिहाराचा खर्चही मोठा असतो. पुरुष कार्यकर्त्यांच्या तुलनेत महिला काहीशा प्रामाणिकपणे काम करू शकतील, या उद्देशाने काही उमेदवारांनी प्रचारातील वेगवेगळ्या कामांसाठी आता महिला बचत गटांकडे मोर्चा वळविला आहे. शहरातील छोटय़ा- मोठय़ा बचत गटांना हाताशी धरून घरोघरी प्रचार पत्रके वाटणे, त्याचप्रमाणे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घडवून आणणे किंवा नेत्याच्या सभेला उपस्थिती लावणे आदी कामांसाठी बचत गटांचा उपयोग करून घेतला जात आहे. या कामासाठी प्रत्येक महिलेला दिवसाला पाचशे ते हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे बचत गटासाठी काही निधीही पुरविला जातो. त्यामुळे अनेक बचत गट सध्या निवडणुकीच्या कामाला लागले असून, हा ‘निवडणूक रोजगार’ त्यांच्यासाठी चांगलाच लाभदायक ठरतो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
महिला बचत गटांनाही उमेदवारांकडून ‘निवडणूक रोजगार’
निवडणुकीत स्वत:चे श्रम व पैसा घालून आपल्या उमेदवाराचे मनापासून काम करणारे खरे कार्यकर्ते केव्हाच संपले आहेत. आता प्रचारातील सर्व गोष्टी पगारी माणसे ठेवून केल्या जातात.
First published on: 01-04-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self help groups election employment bachat gat politics working members