नरेंद्र मोदी चांगली स्वप्ने विकू शकतात, राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, काँग्रेसला जळी-स्थळी मोदी दिसतात, अजितदादांनी निर्णय घेताना कोणाच्या परवानगीची गरज नसते. ‘आप’च्या दणक्याने काँग्रेस खडबडून जागी झाली, अण्णांकडे मनाचा मोठेपणा नाही, राजकारणी भुतापेक्षा मताला घाबरतात, यासारखी विधाने करताना एकमेकांना कोंडीत पकडण्याची चढाओढ, शेरेबाजी, टोलवाटोलवी आणि संवादकाने घेतलेली सर्वाचीच फिरकी यामुळे चिंचवडचा परिसंवाद चांगलाच रंगला.
चिंचवडच्या मैत्री प्रतिष्ठान आयोजित ‘भारतीय राजकारण व आजचा तरूण’ या विषयावरील चर्चासत्रात शिवसेनेच्या प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे सचिन सावंत, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, भाजपचे अतुल भातखळकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व युवकांच्या प्रतिनिधी प्रज्ञा शिदोरे सहभागी झाले होते. ‘एबीपी माझा’ चे प्रसन्न जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगलेल्या चर्चासत्रात अण्णांचे आंदोलन, नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यातील स्पर्धा, चार राज्यातील निवडणुकानंतरची परिस्थिती, शरद पवार यांचे राजकारण, अजितदादांची क्षमता, उद्धव व राज, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासह राजकारणातील घराणेशाही असलेली जिल्हानिहाय घराणी, अरविंद केजरीवाल व ‘आप’चा प्रभाव, साधेपणाची महती, सत्तेचे विकेंद्रीकरण, व्यवस्थेतील दोष, तरूणाईची ताकद, त्यांच्या अपेक्षा व प्रत्यक्षातील वास्तव अशा विविध मुद्दय़ांवर यावेळी चर्चा झाली. तरूणाईच्या प्रश्नांवर अधिक चर्चा होणे अपेक्षित असताना वाहिन्यांवरील चर्चेप्रमाणेच याही ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे काम प्रवक्तयांनी केले आणि संधी मिळेल तेथे संवादकाने प्रवक्तयांची फिरकी घेतली. तेच-तेच चेहरे पाहून लोक कंटाळलेत, असे प्रवक्तयांना उद्देशून केलेल्या विधानास चांगलीच दाद मिळाली.
आदर्श अहवालासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून चर्चेला सुरूवात झाली. हे उशिरा सुचलेले शहाणपण असून त्यांनी राजकीय सोय पाहिल्याची टीका भातखळकर यांनी केली. तर, गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन आमची चूक झाल्याचे मान्य करावे. काँग्रेसची वाटचाल चोराच्या आळंदीकडे आहे. सामाजिक चळवळींना न्याय देणे हे राजकीय पक्षांचे काम आहे. राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे भाकीत करत चौधरींनी मोदी तरूणांना चांगल्या प्रकारे स्वप्न विकू शकतात, असे विधान केले. राजकारणी भुतापेक्षा मताला घाबरतात, हे लक्षात ठेवून तरूणांनी स्वत:चा अजेंडा राबवण्याचे व दबावगटाच्या माध्यमातून तो राबवून घेण्याचे आवाहनही केले. राहुल आणि मोदी यांच्यात स्पर्धाच होऊ शकत नसल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांना जळी-स्थळी मोदीच दिसू लागले आहेत, असे भातखळकर म्हणाले. अजितदादांना कोणाला विचारून काम करण्याची गरज नाही, असे विधान विद्या चव्हाण यांनी केले. अण्णा हजारेंनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा, असे मत त्यांनी केजरीवालांचा मुद्दा मांडताना सांगितला. महिलांना सुरक्षा, शिक्षण, रोजगाराची हमी हवी, अशी अपेक्षा शिदोरे यांनी व्यक्त केली.