अ‍ॅड. एस. के. जैन (ज्येष्ठ विधिज्ञ) 

‘रिड टू लिड.. अँड आय वाँट टू लिड ओन्ली’, हे वाक्य मी कायम लक्षात ठेवले आणि तसे आचारण करीत आलो. जो मनापासून वाचन करेल, तो कोणत्याही क्षेत्रात नेतृत्वगुणाची खरी कमाई करू शकेल. त्यामुळे केवळ पाठय़पुस्तकी वाचनापेक्षा अवांतर वाचन आणि आपल्या क्षेत्राशी निगडित सखोल ज्ञान मिळविण्याकरिता धडपड करण्याचा प्रयत्न मी नेहमीच केला. वकिली व्यवसायात यायचे, हे आधीपासून ठरविले होते. पण, प्रत्येक परीक्षेत उत्तम गुणांनी यशस्वी होत असल्याने विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. तेथून वकिली व्यवसायाकडे येणे, हेदेखील वाचनामुळेच शक्य झाले. एका हिंदी वृत्तपत्रामध्ये ‘बेकार इंजिनियर’ असा लेख वाचला आणि माझे यशस्वी उद्योजक होण्याची मनीषा जागृत झाली. त्यामुळेच इंटर सायन्ससाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सीओईपी) घेतलेला प्रवेश रद्द करून फग्र्युसन महाविद्यालयात द्वितीय वर्ष बी.ए. करिता प्रवेश घेतला आणि पुढे कायद्याचा अभ्यास सुरू केला. कायद्याशी निगडित केवळ एका विषयात प्राविण्य मिळवायचे नाही, असे ठरविले होते. त्यामुळे अगदी गुन्ह्य़ांपासून ते अन्न व औषध विभागासारख्या क्लिष्ट विषयांपर्यंत विविध विषय हाताळताना भरपूर अभ्यास आणि प्रामुख्याने वाचन केले. त्यामुळेच आज कायदा क्षेत्रात एक नामवंत म्हणून नाव मिळविणे शक्य झाले, ते वाचनामुळेच.

माझे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण राजस्थानमधील शिवगंज येथे हिंदी माध्यमामध्ये झाले. तेव्हा घरामध्ये केवळ हिंदी वर्तमानपत्र येत असे. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या वाचनापासून माझा खरा वाचन प्रवास सुरू झाला. त्यासोबतच घरामध्ये संत कबीराचे दोहे, सुमित्रानंदन पंथ आणि मुन्शी प्रेमचंद अशा दिग्गजांची पुस्तकेही होती. त्यामुळे हिंदी साहित्य वाचन ही माझ्या वाचनाची सुरुवात ठरली. माझ्या वडिलांचा सराफी व्यवसाय असल्याने आमचे छोटे दुकान होते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर वडिलांना मदत करण्याकरिता दुकानात बसत होतो आणि उर्वरित वेळेत वर्तमानपत्रांचे वाचन सुरू असायचे. वर्तमानपत्रांमध्ये संपादकीय पानावरील लेखांना फार महत्त्व आहे. त्यामुळे ते लेख वाचणे मला जास्त आवडते.

कालांतराने आम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर इयत्ता सहावीमध्ये खडकी येथील गॅरीसन चिल्ड्रन हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतला. हिंदीसोबतच मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक होते. त्यामुळे पुण्यामध्ये आल्यानंतर मराठी वर्तमानपत्रांचे वाचन करायला मी सुरुवात केली. इयत्ता दहावी आणि अकरावीनंतर वाचनाची गोडी अधिकच वाढली. शाळेमध्ये असताना नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची चरित्रात्मक पुस्तके वाचायला सुरुवात केली होती. ते वाचन पुढे देखील वाढतच गेले. केवळ परीक्षेसाठी मी वाचन करीत नव्हतो. तर आपले ज्ञान वाढावे आणि सर्व क्षेत्रांतील माहिती आपल्याला असावी, यासाठी वाचन करणे मला जास्त आवडायचे. वृत्तपत्रामध्ये एका आयएएस परीक्षेत सर्वोकृष्ट गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत आली होती. त्यामध्ये त्याने इंग्रजीचे महत्त्व सांगितले होते. ते ओळखून मी इंग्रजी वाचन सुरू केले.

इंग्रजी वृत्तपत्रांतील वाचनामुळे माझे आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दलचे कुतूहल वाढत होते. त्यामुळे त्याच्याशी संबंधित पुस्तकेदेखील वाचनात आली. स्वामी विवेकानंदांचे चरित्र, नानी पालखीवाला यांची पुस्तके आणि आणीबाणीवरील साहित्य माझ्या वाचनात आले. माझ्या ज्ञानात भर घालणाऱ्या या पुस्तकांसोबतच आध्यात्मिक साहित्याचे वाचनही मी करीत होतो. आपल्या कार्याला आध्यात्माची जोड नसेल, तर कोणतेही काम पूर्ण होत नाही, हा माझा अनुभव होता. त्यामुळे रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक यापासून ते जैन धर्मातील भक्तामरसारख्या मार्गदर्शक ग्रंथापर्यंत अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी मला पु. ल. देशपांडे यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाटय़ाची चाळ’ तसेच ‘वाऱ्यावरची वरात’ यांसारख्या पुस्तकांनी सोबत केली. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मी खडकी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झालो आणि वाचनाकडे वळण्याकरिता अधिक प्रवृत्त झालो. शिक्षण संस्था असल्याने विविध विषयांशी निगडित शिक्षक येत असत. त्यामुळे इतिहास, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांतील सखोल ज्ञान मलाही असायला हवे, असे वाटू लागले. त्याकरिता मी या विषयांचे अवांतर वाचन करू लागलो. यामुळे शिक्षकांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, मला जास्त सोपे होत गेले.

अमेरिका आणि रशियामधील वादाबद्दल असलेले ‘सेकंड लेडी’, ‘फाळणीचे गुन्हेगार’ अशी पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. आमचे शिक्षक प्राचार्य वि. मा. बाचल यांचा सर्व विषयांवरील सखोल अभ्यास मला अधिक प्रभावित करणारा होता. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे मी सर्वच विषयांच्या पुस्तकांचे वाचन करण्याचा प्रयत्न करीत होतो. वकिली व्यवसायात आल्यानंतर देशातील कर्जमुक्ती कायदा, अन्न आणि औषध, तसेच आरोग्यविषयक खटले समोर येत. त्यामध्ये बाजू मांडताना प्रत्येक विषयाशी संबंधित माहिती आणि सखोल ज्ञान असणे मला आवश्यक होते. त्यामुळे त्याच्याशी संबंधित पुस्तके आणि नोंदी मी काढत असे. आप्पा बळवंत चौकातून पुस्तके खरेदी करण्याची मला फार आवड होती. त्यामुळे अनेकदा मी तेथे जात होतो. तर इतरांनी पुस्तके वाचावी याकरिता माझ्या कार्यालयामध्ये टेबलावर मी दहा-बारा पुस्तके आर्वजून ठेवतो आणि समोरच्या व्यक्तीला देतो. वाचन चळवळ सर्वत्र रुजावी, हीच त्यामागची भावना.

खडकी शिक्षण संस्थेप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेवर मी सध्या कार्यरत असल्याने स. प. महाविद्यालयातील ग्रंथालयात जाणे होते. तेथील पुस्तकांचा संग्रह पाहून आपण काहीच पुस्तके वाचली नाहीत, असेच वाटले. वाचनामुळे आपले विचार समृद्ध होतात. ज्ञानात भर पडल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. वर्तमानपत्र हे वाचनाकरिता उत्तम साधन असून सहज उपलब्ध होणारे आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करायला हवे. त्यात नुकतेच ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांना भेट द्यायला गेलो असताना तेथील १० लाख चौरस फुटांचे वाचनालय पाहून अवाक् झालो. आपल्या येथे देखील ग्रंथालयाला एवढी मोठी जागा मिळायला हवी, असे नेहमी वाटते.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ