पुणे : एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करून चाेरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक बोपोडी भागात राहायला आहेत. ते शुक्रवारी (९ मे) खडकी बाजार परिसरात कामानिमित्त आले होते. खडकी बाजारमधील एका बँकेच्या एटीएममध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले. एटीएमच्या बाहेर २० ते २५ वर्षांचा चोरटा पाळत ठेवून थांबला होता. ज्येष्ठाच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. ज्येष्ठाने एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे बाहेर पडले नाहीत. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. पैसे काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड, तसेच सांकेतिक क्रमांक (पासवर्ड) घेतला. चोरट्याने पैसे काढण्यासाठी दुसरे एटीएम कार्ड वापरले. पैसे बाहेर पडले नाहीत. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी चोरट्याने केली. चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठाला दिले.
दरम्यान, चोरट्याकडे ज्येष्ठाचे एटीएम कार्ड आले होते. एटीएम कार्ड आणि सांकेतिक क्रमांकाचा गैरवापर करून चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून एक लाख रुपयांची रोकड चोरली. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे तपास करत आहेत.
चोरटे वापरताहेत ही क्लृप्ति
‘एटीएम’मधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ‘एटीएम’मधून पैसे काढणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना मध्यंतरी वारजे पोलिसांनी पकडले होते. चोरटे ‘एटीएम’च्या परिसरात पाळत ठेवतात. ज्या भागातून पैसे बाहेर येतात (कॅश डिस्पेन्स) तेथे लोखंडी पट्टी लावतात. पैसे बाहेर न पडल्याने ज्येष्ठ नागरिक गोंधळात पडतात. त्यानंतर चोरटे ज्येष्ठांकडे मदतीचा बहाणा करतात. त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक क्रमांक घेतात. या दरम्यान चोरटे त्यांच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठांना देतात. एटीएम कार्ड आणि सांकेतिक क्रमांकाचा गैरवापर करून चोरटे रोकड चोरून नेतात.