पुणे : ‘नर्तकाने नृत्याबद्दल लिहायला हवे, अनुभव व्यक्त करायला हवेत. त्यानेच नवे विद्यार्थी घडतात. त्यांना प्रोत्साहन मिळते,’ असे मत ज्येष्ठ कथक गुरू शमा भाटे यांनी गुरूवारी व्यक्त केले.
मनीषा नृत्यालयाच्या वतीने कथक गुरू भाटे यांच्यासह सुचेता भिडे-चापेकर आणि रोशन दाते यांच्या हस्ते कथक नृत्य शिक्षणपद्धतीवर आधारित ‘कथकानुगमन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लेखिका मनीषा साठे, प्रकाशक पराग पिंपळे या वेळी उपस्थित होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याच कार्यक्रमात पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या पायल गोखले, भाषा संस्करण करणाऱ्या मानसी गदो, इंग्रजीत भावानुवाद करणाऱ्या अदिती कुलकर्णी, मुखपृष्ठ साकारणाऱ्या कीर्ती कुरंडे यांना सन्मानित करण्यात आले.
भाटे म्हणाल्या, ‘दीर्घ काळ नृत्य शिक्षक म्हणून काम करणे, विद्यार्थ्यांना घडवणे अवघड काम आहे. सातत्याने नृत्य शिकवत राहणे, कष्टाचे काम असते. त्यामुळे नृत्य शिक्षकाने, नर्तकाने त्याचे अनुभव लिहायला हवेत. नवे विद्यार्थी घडवायला हवेत.’
‘कथक किंवा कोणतीही कला मोठ्या कष्टाने जोपासावी लागते. त्यासाठी अंगभूत कला गुणांना वाव मिळणे, गरजेचे असते. कला शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे,’ असे सांगून दाते यांनी साठे यांच्या पुस्तकातील काही उताऱ्यांचे वाचन केले.
चापेकर म्हणाल्या, ‘पुण्यात कथक शिकणाऱ्या मुला मुलींचे प्रमाण कमी आहे. मात्र, शिक्षकाने मुलांना आणि मुलींना शिकवताना सर्व बारकावे विचारातून घेऊन दोघांनाही सर्व पैलूंचे शिक्षण द्यायला हवे. साठे यांनी परंपरा आणि नवता यांचा संगम साधून पुस्तकातूनही कथक शिक्षणाचे धडे दिले आहेत. त्यामुळे सर्व विद्यापीठांमध्ये, कला विभागांमध्ये ‘कथकानुगमन’चा समावेश करायला हवा.’
पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, आभार मानले.
शिष्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कथक शिक्षणाची सुसंगत, सखोल दिशा सापडावी म्हणून पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. त्यात कथक शिकवताना आलेल्या अनेक अनुभवांचा समावेश आहे. कथक शिकणाऱ्या, शिकवणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.- मनीषा साठे, लेखिका, कथकानुगमन