पुणे : महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना आवश्यक असलेली ना हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) मिळण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुुरुवात केली आहे. निवडणुकीची ना हरकत प्रमाणपत्रे तातडीने मिळावीत यासाठी महापालिका स्वतंत्र कक्ष उभारणार असून, संबंधितांचे हेलपाटे वाचणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हरकती-सूचना, राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग यांची मंजुरीची प्रक्रिया होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यानंतर कधीही महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना अर्जाबरोबर महापालिकेच्या विविध खात्यांकडून कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र लवकर उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र कक्ष उभारला जाणार आहे.

महापालिकेने मागील निवडणुकीत २०१७ मध्ये प्रमाणपत्र कक्ष स्थापन केला होता. मात्र, त्या वेळी काही विभागांकडून प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत यामध्ये काही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिका आयुक्तांकडून आढावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम हेदेखील विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी, परिमंडल उपायुक्त, तसेच विभागप्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये कोणत्या खात्यांकडे उमेदवारांची थकबाकी असते, एकत्रित प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याचे उपाय, तसेच कक्षाच्या कामकाजासाठी वेळमर्यादा आणि जबाबदाऱ्या, याबाबत चर्चा केली जाणार आहे.