लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे विमानतळावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने तेथील अडचणीही वाढत आहेत. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांकडून वारंवार तक्रारीचा सूर आळवला जात असताना विमानतळ प्रशासनाकडून पावले उचलली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे समस्यातून प्रवाशांची सुटका होत नसल्याचे चित्र आहे.

पुणे विमानतळावरील गैरसोयींची पाढा प्रवासी दररोज समाजमाध्यमांवर वाचत आहेत. त्यात विमानतळात प्रवेश करणे, सुरक्षा तपासणीतील अडचणी आणि विमान कंपन्यांचा हलगर्जीपणा या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत. अनेक प्रवाशांनी प्रवेशासाठीच्या लांब रांगा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्याचबरोबर बॅगांच्या स्कॅनिंगसाठी केवळ एक्स-रे यंत्र असल्याने उशीर होत असल्याची अनेक प्रवाशांची तक्रार आहे.

आणखी वाचा-मेट्रोच्या विस्तारित मार्गांची सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी; अंतिम अहवालानंतर मार्ग खुला

पुणे विमानतळाशेजारी एरोमॉल हे पार्किंग सुरू करण्यात आले. प्रवाशांना सोडण्यास अथवा नेण्यास येणाऱ्या ओला अथवा उबरच्या कॅबसाठी पिकअप पॉइंट एरोमॉलमध्ये आहे. प्रवाशांना तेथून थेट विमानतळात प्रवेश करता येतो. त्यासाठी विमानतळ आणि एरोमॉल यांना जोडणारा पादचारी पूलही आहे. प्रत्यक्षात विमानतळावर उतरल्यानंतर अनेक प्रवाशांना एरोमॉलकडे जाण्यासाठी अनेकदा पायपीट करावी लागते. सरकता जिना बंद असल्यास प्रवाशांना तेथून २० मिनिटे पायपीट करीत एरोमॉलला पोहोचून कॅब गाठावी लागते.

अडीच तास आधी बोलावणे

गर्दीमुळे अनेक विमान कंपन्या प्रवाशांना तब्बल अडीच तास आधीच विमानतळावर बोलावत आहेत. देशांतर्गत विमान प्रवासासाठी ही वेळ असून, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तर साडेतीन तास आधी बोलावले जात आहे. अनेक प्रवाशांच्या विमान प्रवासाच्या वेळेपेक्षा हा कालावधी जास्त आहे.