पुणे : हिवतापावरील आर २१/ मॅट्रिक्स एम या लशीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सुरू केले आहे. या लशीचा पुरवठा सर्वप्रथम आफ्रिकेतील देशांना करण्यास सुरुवात झाली आहे. सीरममधून सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशाला या लशीचे ४३ हजार २०० डोस पाठविण्यात आले आहेत. मात्र, भारतीयांसाठी हिवतापाची लस विकसित होण्यास ५ ते ७ वर्षांचा कालावधी लागणार आहे.
सीरमने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि नोव्हाव्हॅक्स यांच्यासोबत हिवतापावरील आर २१/ मॅट्रिक्स एम लस विकसित केली आहे. हिवतापाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये लहान मुलांना ही लस देण्यास परवानगी मिळालेली आहे. अशा प्रकारची परवानगी मिळालेली ही दुसरी लस आहे. सीरमकडून आफ्रिका खंडातील देशांना या लशीचा पुरवठा केला जाणार आहे. त्यात सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशाला १ लाख ६३ हजार ८०० डोस दिले जाणार आहेत. त्यातील ४३ हजार २०० डोस पाठविण्यात आले आहेत.
सीरमने निर्माण केलेली हिवतापावरील लस ही आफ्रिकेतील विषाणू प्रकारावर परिणामकारक ठरणारी आहे. भारतातील हिवतापावरील लस विकसित होण्यास किमान पाच ते सात वर्षांचा कालावधी लागू शकतो. याचबरोबर पुढील दोन वर्षांत डेंग्यूवरील लशीची निर्मितीही सीरमकडून केली जाणार आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली.
सीरमने हिवतापावरील लशीच्या अडीच कोटी डोसची निर्मिती केली असून, कंपनी वर्षाला १० कोटी डोसची निर्मिती करू शकते. या कार्यक्रमाला अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधिका डॉ. मेहरीन दातू, नोव्हाव्हॅक्सच्या कार्यकारी उपाध्यक्षा सिल्विया टेलर आणि सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला आदी उपस्थित होते.
अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध खासगी क्षेत्रातही वृद्धिंगत होत आहेत. त्यात संशोधन, ज्ञान आणि उच्च गुणवत्तेच्या आरोग्यसुविधा या क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. या भागीदारीतून निर्माण झालेल्या हिवतापावरील लशीमुळे जगभरात दरवर्षी हजारो जणांचे जीव वाचणार आहेत. – एरिक गारसेटी, अमेरिकेचे भारतातील राजदूत