पाण्याच्या टंचाईमुळे शहरात पाणीकपात लागू झाली असून महापालिकेतर्फे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात जे पाणी शुद्ध केले जाते ते नदीत न सोडता उद्याने तसेच अन्य ठिकाणी या पाण्याचा पुनर्वापर केल्यास पाण्याची मोठी बचत होऊ शकते. त्या दृष्टीने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचा पुनर्वापर केला जावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
धरणांमधील पाण्याची सद्यस्थिती पाहून शहरात पाणीकपात सुरू झाली आहे. पाणीकपातीबरोबरच शहरात पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण आखणे आवश्यक असून त्या दृष्टीने काही उपाययोजना सुचवल्याचे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी सोमवारी सांगितले. पाण्याचा पुनर्वापर महापालिका कशा पद्धतीने करू शकते यासंबंधीचे सविस्तर निवेदनही सजग नागरिक मंचतर्फे सोमवारी आयुक्तांना देण्यात आले. महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये रोज पाचशे दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते. हे प्रकल्प उभारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, शुद्ध झालेले हे पाणी नदीच्या अशुद्ध पाण्यात सोडण्यात येते. त्यामुळे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर होणारा खर्चही वाया जातो. तसेच हे प्रकल्प चालवण्यासाठी जो खर्च केला जात आहे तोही वाया जातो. त्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर जे पाणी शुद्ध होते ते पाणी महापालिकेच्या उद्यानांमध्ये वापरता येईल. तसेच अनेक रस्त्यांवर दुभाजकांमध्ये जी झाडे लावण्यात आली आहेत त्या झाडांसाठी देखील हे पाणी वापरता येईल. या झाडांना पाणी देण्याचे काम ज्या ठेकेदारांना देण्यात आले आहे त्या ठेकेदारांना नाममात्र शुल्कात हे पाणी उपलब्ध करून द्यावे. सध्या बहुतेक ठेकेदार या झाडांना टँकरद्वारे पाणी देतात. त्या ऐवजी त्यांना शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी द्यावे, अशा सूचना सजग नागरिक मंचने केल्या आहेत. ड्रेनेजचे पाणी तुंबल्यास ती स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने ठेकेदारांना काम दिले असून या कामासाठी देखील हेच पाणी वापरण्याची सक्ती करावी व त्यांनाही नाममात्र दरात हे पाणी पुरवावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. या तिन्ही सूचनांची अंमलबजावणी पिंपरी महापालिकेत सुरू आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पीएमपीच्या डेपोंमध्ये गाडय़ा धुण्यासाठी जे पाणी वापरले जाते त्या ठिकाणी देखील शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी वापरणे बंधनकारक करावे. तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी बांधकामांना पुरवण्याची व्यवस्था करता येईल, अशीही सूचना करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2014 रोजी प्रकाशित
सांडपाणी प्रकल्पातील पाण्याचा महापालिकेने पुनर्वापर करावा
पाण्याचा पुनर्वापर महापालिका कशा पद्धतीने करू शकते यासंबंधीचे सविस्तर निवेदनही सजग नागरिक मंचतर्फे सोमवारी आयुक्तांना देण्यात आले. महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये रोज पाचशे दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते.
First published on: 01-07-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage water reuse pmc