उंड्री येथील जमिनीवर स्वस्त घरे देण्याच्या आमिषाने ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगाने जमीन मालक शालूताई बुद्धिवंत यांना एक लाख रुपयांचा, तर लुकमान खान यांना ५० हजार रुपयांचा दंड केला आहे. ही रक्कम एका महिन्याच्या काळात देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
उंड्री येथे त्रिशूल बिल्डरतर्फे शालिनी लेक व्हय़ू ही पाचशे फ्लॅट्सची योजना आखण्यात आली होती. ही योजना सरकारने १९७८ साली पाझर तलावासाठी अधिग्रहण केलेल्या जागेवर होती. तेथे त्रिशूल बिल्डरतर्फे २००८-०९ मध्ये योजना सुरू करण्यात आली. मात्र, हे बांधकाम अर्धवट असतानाच जिल्हा परिषदेने ते पाडले होते. या ठिकाणी गरीब कुटुंबांना स्वस्तात घरे मिळवून देण्याचे आमिष बिल्डर हेमंत बुद्धिवंत, जमिनीच्या मालक शालूताई बुद्धिवंत, कासीन शेख, लुकमान शेख यांनी दाखवले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची पूर्तता न करता ग्राहकांची फसवणूक केली. यामुळे अनेक गरीब नागरिकांचे घरांचे स्वप्न तर भंगलेच, शिवाय त्यांची मोठी आर्थिक फसवणूकही झाली. या गरीब गुंतवणूकदारांच्या वतीने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने हे प्रकरण ग्राहक न्यायालयात नेले.
ग्राहक पंचायत आणि ‘शामिली लेक व्हय़ू’ अॅडहॉक समितीने या फसवणुकीसंदर्भात बिल्डर हेमंत बुद्धिवंत, त्रिशूल बिल्डर आणि जमीन मालक शालूताई बुद्धिवंत, कासीम शेख, लुकमान खान यांच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याबाबत न्यायालयाने नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, शालूताई बुद्धिवंत व काहींनी त्याला उत्तर दिले नाही. या संदर्भात १४ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. त्या वेळी आयोगाने असा निर्णय दिला, की नोटिशीला उत्तर न दिल्याबद्दल शालूताई बुद्धिवंत यांना एक लाख रुपयांचा, तर कासीम शेख यांना ५० हजार रुपयांचा दंड केला. त्याचबरोबर एकतर्फी सुनावणी आदेश रद्द केला. दंडाच्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम तक्रारदारांना देण्याचा आणि २५ टक्के रक्कम ग्राहक कल्याण कोशामध्ये जमा करण्याचे आदेश दिले. हे करण्यास न्यायालयाने ३० दिवसांची मुदत दिली आहे. याबाबतची पुढची सुनावणी येत्या ८ ऑक्टोबरला होणार आहे. या संदर्भात ग्राहक पंचायतीचे विलास लेले यांनी माहिती दिली. या प्रकरणाचा पुढेही मागोवा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
५ ते १६ ऑक्टोबरदरम्यान
राष्ट्रीय ग्राहक आयोग पुण्यात
पुण्यातील ग्राहकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय ग्राहक आयोग येत्या ५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात येत आहे. या काळात ते पुण्यातील ग्राहकांच्या सुनावणीसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे पुण्यातील ग्राहकांच्या समस्या सुटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2015 रोजी प्रकाशित
शालूताई बुद्धिवंत यांना एक लाखांचा दंड
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगाने जमीन मालक शालूताई बुद्धिवंत यांना एक लाख रुपयांचा, तर लुकमान खान यांना ५० हजार रुपयांचा दंड केला आहे.

First published on: 20-08-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalutai buddhivant crime home fine court