ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने पुराव्यांवरून मलिकांचे दाऊदसोबत संबंध असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं मत नोंदवलं. यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या याच मताचा आधार घेत मलिक आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. आता यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. ते शनिवारी (२१ मे) पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबतच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमबाबत जे सांगितलं ते मत आहे, तो न्यायालयाचा निकाल नाही. न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय येईल तेव्हा आम्ही त्यावर बोलू. मी अनेक वर्षे नवाब मलिक यांना ओळखतो. मला खात्री आहे की त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. माझ्या मनात त्यांच्या कटिबद्धतेबद्दल अजिबात शंका नाही. त्यांचा चुकीच्या लोकांसोबत संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही.”

“माझ्यावरही अनेकदा असेच आरोप झाले होते”

“असे आरोप केले जातात. त्याचं एकच उदाहरण सांगतो आणि हे उदाहरण म्हणजे शरद पवार आहे. माझ्यावरही अनेकदा असेच आरोप झाले होते. काही लोकांनी तशी अनेकदा टीका-टिपण्णी केली होती. शेवटी ज्यांनी आरोप केले होते त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधीमंडळात भाषण करून सांगितलं की आम्ही जी टीका केली त्यात काही तथ्य नाही. आम्ही विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो,”

“माझी खात्री आहे की जेव्हा सर्व चित्र समोर येईल त्यावेळी नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा : ब्राह्मण संघटनांसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “दवे नावाच्या व्यक्तीने…”

न्यायालयाने नेमकं काय म्हटलं होतं?

विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहूल एन रोकडे यांनी म्हटलं होतं, “आरोपी नवाब मलिक यांनी डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती बळकावली.”

“मलिक यांनी दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकावल्याने त्यांच्याविरोधात मनी लाँण्ड्रींगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल. या सर्वांनी या गुन्ह्यांतून मिळणारे उत्पन्न हे बेकायदेशीर कृत्यांमधून मिळवले आहे,” असं न्यायालयाने म्हटलं.

हेही वाचा : दाऊदच्या लोकांसोबत मिळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं पुराव्यांवरुन दिसत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रथमदर्शनी असं दिसून येतय की आरोपी हा थेट आणि सर्व माहिती असूनही मनी लाँण्ड्रींगमध्ये सहभागी होती. त्यामुळेच तो पीएमएलए अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या कलमाअंतर्गत मनी लॉण्ड्रींगचा गुन्हा करण्यासाठी दोषी ठरतो. कलम ४ नुसार तो शिक्षेस पात्र ठरतो,” असंही न्यायालयाने म्हटल्याचं वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडियाने’ दिलंय.