लोकसत्ता वार्ताहर

बारामती : ज्याने पक्ष स्थापन केला, त्याचा पक्ष काढून घेतला, असे यापूर्वी देशात कधी झाले नव्हते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्ताने असे प्रथमच घडले आहे. मात्र संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही. पुन्हा नव्या जोमाने आपण राज्यात संघटना बांधणार आहे, असा निर्धार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला.

बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील (जि. सोलापूर) काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यावेळी पवार यांनी हा निर्धार बोलून दाखवला.

आणखी वाचा-अजित पवारांना जेलमध्ये जावं लागेल म्हणून भाजपसोबत गेले – रोहित पवार

पवार म्हणाले, की यापूर्वी देशामध्ये अनेकदा पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्या. ज्याने पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून घेणे, हे कायद्याला धरून वाटत नाही. त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. त्याचा योग्य निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे. सामान्य माणसाशी संपर्क कायम वाढला पाहिजे. त्याला पण नव्याने काय देऊ शकतो, यावर विचार केला पाहिजे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत. आपण नव्या उमेदीने महाराष्ट्रात फिरून लोकांशी संपर्क साधून लोकांना भूमिका पटवून देणार आहोत. त्यामध्ये पक्ष आणि चिन्ह याची फारशी अडचण येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिन्हाची फार चिंता करायची नाही. आजपर्यंत मी १४ वेळा निवडणुका लढलो. त्यापैकी पाच निवडणुकांचे चिन्ह हे बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा आणि घड्याळ, अशी होती. मात्र, चिन्ह काढून घेतले म्हणजे त्या संघटनेचा अस्तित्व संपेल, असे कधी घडत नाही. -शरद पवार, ज्येष्ठ नेते