अजित पवार यांना पक्ष चिन्ह आणि नाव दिल्याने शरद पवार गटाच पुण्यात काळ्या फिती लावून आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पात्र की अपात्र, या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह कुणाचे याबाबत काल निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानंतर राज्यभरातील अजित पवार गटाच्या नेतेमंडळींनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत टीका केली आहे.
हेही वाचा >>> पुणे : पोलीस भरतीला आला आणि पाच वर्षांसाठी तुरुंगात गेला
या सर्व घडामोडींदरम्यान आज पुण्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पक्षाच्या कार्यालयाबाहेर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून ‘गली गली में शोर है, अजित पवार चोर है’, ‘जो नाही झाला काकाचा, तो नाही होणार जनतेचा’, अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध नोंदविला. तसेच यावेळी पक्ष कार्यालयामधील कोनशिला काढून, त्यावर असलेले अजित पवार यांचे नाव हातोडी मारून काढून टाकण्यात आले.
हेही वाचा >>> पिंपरी : मोबाईल दिला नाही म्हणून घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत काल केंद्रीय निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला, तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. आमच्या पक्षाचे नाव, चिन्ह जरी त्यांना दिले असले तरी आमच्याकडे शरद पवार आहेत हे केंद्र आणि राज्य सरकारने लक्षात ठेवावे. आम्ही आता नवीन नाव आणि पक्षचिन्हासह लवकरच जनतेच्या समोर जाणार आहे. पण, आज एकच वाटते ते म्हणजे मागील काही वर्षांत भाजप सरकारचा कारभार हुकूमशाहीकडे जात आहे, असे आम्ही सर्व म्हणत होतो; मात्र आज ते खरे झाले. निवडणूक आयोग, तपास यंत्रणा या सर्व केंद्र सरकारच्या आदेशानुसार चालत आहेत. त्यामुळे हे आगामी काळात आपल्या सर्वांसाठी घातक ठरणार असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली.