सोमवारी पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोदी यांच्या टीकेला आता प्रत्युत्तर दिले आहे. जुन्नरमधील एका सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

“पंतप्रधान मोदींचे म्हणणं खरं आहे. आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे दुखणं बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई वाढली आहे, लोकांना संसार करणं कठीण झालं आहे, त्यासाठी अस्वस्थ आहे. अडचणीत असणाऱ्या लोकांचे दुख: मांडणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे माझं कर्तव्य आहे, माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे”, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. “आज चांगले काम करणाऱ्यांविरोधात सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. ज्यांच्या हातात आज सत्ता आहे, ते लोक सत्तेचा वापर गैरवापर करत असून राजकीय दृष्ट्या वेगळा विचार असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून सोडवण्यासाठी करायचा असतो, मात्र, आताचे सत्ताधारी या सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी करत आहेत”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल, “महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेत्याने ९० च्या दशकापासून..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. जर ती टीका चुकीची असेल तर तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकारही आहे. मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत उत्तम काम केलं. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध केला, म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.