प्रकाश आंबेडकर यांची मागणी

कोपर्डीप्रकरणी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केली.

कोपर्डी भेटीला पोलिसांनी मनाई केल्याच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. कोपर्डी प्रकरणात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. राजकारणाचा स्तर खालावत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यामध्ये मध्यस्थी करून परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली.

दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूचा लोकसहभागातूनच विकास अभिप्रेत आहे. त्यामुळे आंबेडकर भवन श्रमदानातून आणि लोकवर्गणीतूनच उभारणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आंबेडकर भवन पाडताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे आयोगाकडून काही हलगर्जीपणा झाला आहे का याचीही चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी आंबेडकर यांनी केली. आंबेडकर भवनाच्या उभारणीसाठी लोकवर्गणी कधीही कमी पडणार नाही. तसेच सरकारने भर घालण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.