पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्त्व साजरे करण्यासाठी व महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरूच्या संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट व्हावे यासाठी राज्य शासनातर्फे १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत ‘शेकरू महोत्सव’ आयोजन करण्यात येणार आहे.
पश्चिम घाटातील महत्त्वाच्या स्थळांना १ जुलै २०१२ रोजी युनेस्कोकडून ‘जागतिक वारसा स्थळां’ चा दर्जा मिळाला आहे. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. पश्चिम घाट परिसरातील भीमाशंकर, फणसाड, आजोबा डोंगररांगा, माहुली, वासोटा या जंगलांत, तसेच मेळघाट व ताडोबा या ठिकाणी शेकरू हा प्राणी आढळतो. त्याच्या नावाने होणाऱ्या महोत्सवाची सुरुवात १ जुलैला पुण्यात ‘यशदा’ येथे होणार असून, पश्चिम घाट क्षेत्रातील इको क्लबच्या वीस शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक महोत्सवात सहभागी होणार आहेत. शेकरू संवर्धनासंबंधीचे माहितीपर खेळ, प्रश्नमंजूषा, फेस पेंटिंग, टॅटू पेंटिंग, वेशभूषा अशा उपक्रमांचा समावेश महोत्सवाच्या पहिल्या दिवशी असणार आहे. २ ते १५ जुलै या कालावधीत विद्यार्थी स्थानिक स्तरावर शेकरू संवर्धनासाठीचे जनजागृती कार्यक्रम करणार आहेत. यात शेकरू अधिवास आणि खाद्य यासाठी वनस्पतींच्या बियांचे संकलन, रोपवाटिका विकसन, वृक्षारोपण, पथनाटय़े, प्रभात फेऱ्या आदींचा समावेश असणार आहे.