शिवसेनेचे माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदारसंघातील तीनशेहून अधिक शिवसैनिकांनी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेतेच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

राज्यातील सत्ताबदलानंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबत जाहीर टीका करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते. विजय शिवतारे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी होईल आणि शिवसेनेला खिंडार पडले, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र विजय शिवतारे यांच्या पक्ष सोडण्याने शिवसेनेला काही नुकसान होणार नाही, असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरंदर मतदारसंघातील माजी आमदार पक्षातून बाहेर पडले असले, तरी संपूर्ण शिवसेना आणि सर्व पदाधिकारी, शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, हा विश्वास देण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबई गाठली. पुरंदर मतदारसंघातील फुरसुंगी, शेवाळवाडी, उंड्री, पिसोळी, उरूळी, वडाचीवाडी, औताडेवाडी, आंबेगाव पठार, दत्तनकर, मांगडेवाडी, गुजरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या पुण्याच्या भागातून आणि ग्रामीण भागातून शिवसैनिकांनी पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली.