राष्ट्रवादीचे ‘वेट अँड वॉच’
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील संभाव्य युतीचा काडीमोड झाल्यानंतर पिंपरीत दोन्ही पक्षात उमेदवार निवडीवरून बराच काथ्याकूट सुरू आहे. भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा वाद पराकोटीला गेल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यात हस्तक्षेप केला आहे, तर शिवसेनेच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी ‘मातोश्री’चे खास दूत म्हणून खासदार विनायक राऊत मुंबईहून बैठकीसाठी आले. युतीच्या घडामोडींवर लक्ष ठेवून राष्ट्रवादीने काँग्रेसशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले असून कोणताही निर्णय घेण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असतानाही कोणत्याही राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. उमेदवार यादीसाठी वाकडला शिवसेनेची बैठक झाली. खासदार राऊत, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे आदी उपस्थित होते. बैठकीत अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली. सुमारे ९० नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर ती जाहीर करण्यात येणार आहे. मतभेद असल्याने अन्य नावांबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही, त्याचा निर्णय ‘मातोश्री’वरच होणार आहे. सेना नेत्यांची सोमवारी (३० जानेवारी) पुन्हा बैठक होणार आहे.
भाजपची बाणेरला बैठक झाली. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, अॅड. सचिन पटवर्धन उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नव्या-जुन्यांच्या वादाचे सावट बैठकीवर होते. एकतर्फी यादी होऊ नये, असा आग्रह पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी धरला होता. दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर ४५ नावांवर सहमती झाली. उशिरापर्यंत बैठक सुरूच होती. रविवारी (२९ जानेवारी) पुन्हा बैठक होणार असून यादीवर अंतिम हात फिरवण्यात येणार आहे. युतीतील दोन्हीही पक्षांचे उमेदवार निश्चित होईपर्यंत आघाडीच्या जागावाटपाचा व राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय न घेण्याचे धोरण अजित पवारांनी ठेवल्याचे दिसून येते.
* शिवसेनेची पहिली ९० जणांची यादी तयार; सोमवारी पुन्हा बैठक
* भाजपची ४५ नावांवर सहमती; रविवारी पुन्हा बैठक
* काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र सुरू; चर्चा निष्फळ