शिवसेनेतून बाहेर पडलेले समाधानी नाहीत. छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासह अनेक जण आहेत, जे आता अश्रू ढाळताना व जुन्या स्मृतींना उजाळा देताना दिसतात. भुजबळ सेना सोडून गेले, तेव्हा युतीची सत्ता आली होती, असे शिवसेनेचे उपनेते शशिकांत सुतार यांनी पिंपरीत बोलताना स्पष्ट केले.
मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली, त्याची माहिती सुतारांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, शहरप्रमुख राहुल कलाटे, भाजपचे शहरप्रमुख सदाशिव खाडे, रपिंाइंच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.
सुतार म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची भावना नागरिकांमध्ये आहे. महायुतीला चांगले वातावरण आहे. बारणे यांचा विजय निश्चित असून १४ एप्रिलला होणारी उद्धव ठाकरे यांची चिंचवडची सभा ‘विजयी सभा’च असणार आहे. शिवसेनेत गटबाजी नाही, फूटही नाही. विरोधकांकडून तशा वावडय़ा उठवल्या जातात. व्यक्तीसाठी शिवसेना नाही, अनेकजण सेना सोडून गेले. तेव्हा पक्ष संपला, अशी ओरड झाली. प्रत्यक्षात तसे नाही. छगन भुजबळ सेना सोडून गेले, त्यानंतर युतीची सत्ता आली. सेनेबाहेर गेलेले समाधानी नाहीत. भुजबळ, नारायण राणे आता अश्रू ढाळतात. मावळात शिवसेनेच्या ज्या तीन नगरसेविका पक्षविरोधी काम करतात, त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई करू. बारणे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्याशिवाय, डॉ. अमोल कोल्हे, आदेश बांदेकर, रामदास कदम यांच्या जाहीर सभा होणार असून भाजप नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरू आहे, असे सुतार यांनी स्पष्ट केले.