पुणे : शिवसेनेतील पक्षाअंतर्गत सत्तासंघर्ष सोडविण्यात अडकलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवारी पुण्यातील वाहतूक कोंडीतही अडकले. पुण्यात नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी येत असताना आदित्य ठाकरे यांचा ताफा वीस ते पंचवीस मिनिटे वाहतूक कोंडीत अडकला.

दरम्यान, ‘मर्सिडीज-बेन्झ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना रिक्षाने प्रवास करावा लागल्याची घटना ताजी असतानाच आदित्य ठाकरे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे मुंबईहून पुण्याला येत असताना त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. आदित्य यांचा  ताफा तब्बल वीस ते पंचवीस मिनिट पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकला होता. वाकडेवाडी परिसरातून आदित्य ठाकरे सारसबागेच्या दिशेने जात असताना तब्बल वीस ते पंचवीस मिनिट अडकून पडले होते. शहरात मुसळधार पाऊस आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे आदित्य यांना कार्यक्रमाला जाण्यासाठी देखील उशीर झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. त्यातच पावसाने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चाैकातील वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर शुक्रवारी मर्सिजिड बेन्झचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन श्वेंक यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.