पिंपरी- चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या विधानाची शिवसेना नेते भरत गोगावले यांनी खिल्ली उडवली आहे. अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं आहे, ते त्यांना विचारतो. अस म्हणत भरत गोगावले यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली. भरत गोगावले हे आळंदीत पत्रकारांशी बोलत होते.आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्म सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला भरत गोगावले यांनी भेट दिली. भरत गोगावले यांनी कीर्तनात सहभाग नोंदवला. कीर्तनात गोगावले तल्लीन झाले होते.

भरत गोगावले म्हणाले, राजकारणात आणि खेळात कधी काही होईल हे सांगता येत नाही. राजकारणात कोण कुठे जाईल हे सांगू शकत नाही. अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं आहे, ते त्यांना विचारतो. पुढे ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची पहिली युती आहे. मग, तिसरा आला आहे. अजित पवारांनी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही. पण, त्यावर आता काही सांगू शकत नाहीत. पुढे ते म्हणाले, संजय राऊत हे सकाळ चा भोंगा आहेत. दररोज नवनवीन क्लुप्त्या काढत असतात. संजय राऊत यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाहीत. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे चालवतात, राष्ट्रवादी पक्ष अजित पवार तर भाजप पक्ष मोदी आणि अमित शहा चालवतात. अस राऊतांच्या आरोपांवर भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवारांनी नेमकं काय म्हणाले होते?

मुंबईत जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. “मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटत. पण कुठं जमतंय?. कधी न कधी तो योग येईल. नाही असं नाही. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. जयललिता या स्वतःच्या ताकदीवर राज्य चालवत आहेत.” अस अजित पवार म्हणाले.