रायगडमध्ये आपल्या विरोधात शेकापचे उमेदवार म्हणून रमेश कदमांची उमेदवारी ही राष्ट्रवादीची ‘मॅचफिक्सिंग’ होती. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुबईत झालेल्या एका गुप्त बैठकीत ही ‘फिक्सिंग’ ठरली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिंचवड येथे केला. उद्योगमंत्री नारायण राणे आता कालबाह्य़ नेते झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांच्या ‘उद्धव श्री’ या कार्यक्रमातील पुरस्कार वितरणासाठी गीते चिंचवडला आले होते, तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले. रमेश कदम राष्ट्रवादीचे होते आणि निवडणुकीनंतर तिकडेच गेले. आपल्या पराभवासाठी त्यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. उमेदवार पुरवणारे आमचेच नेते होते. आपल्या पराभवासाठी या मंडळींनी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. राणेंना कोकणातील जनतेने मतपेटीतून उत्तर दिले असून ते आता कालबाह्य़ नेते झाले आहेत. माळीणच्या दुर्घटनेनंतर पुनर्वसनाचे काम महत्त्वाचे असून त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. २००५ मध्ये महाडला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ८९ गाडले गेले होते. कोकणात दरड कोसळण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र, पुण्यात प्रथमच अशी घटना घडली. देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह व शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावांनी सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कर्नाटक सरकारने मराठी भाषकांवर केलेला लाठीमार हा जुलमी आणि निंदाजनक प्रकार आहे. बेळगाव सीमा प्रश्नाच्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा, त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. या संदर्भात, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्राला मिळावा, यासाठी ५८ वर्षे पाठपुरावा सुरू आहे. येळ्ळूरमधील पोलिसांनी फलकाच्या कारणावरून मनुष्यांना तसेच गुरांनाही झोडपले. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत शिवसेनेने संसदेचे सभागृह बंद पाडले, याकडे गीते यांनी लक्ष वेधले.
‘अवजड उद्योग खात्याला सध्या वाईट दिवस’
केंद्राच्या अवजड उद्योग खात्याला सध्या वाईट दिवस आले आहेत, अशी टिपणी अनंत गीते यांनी या वेळी केली. या खात्याविषयी फार काही बोलणार नाही. मात्र आव्हान म्हणून पद स्वीकारले आहे. सहा वेळा खासदार झालो. शिवसेनेचे सगळे खासदार कर्तृत्वान आहेत. मात्र, मंत्रिपदाचे भाग्य रायगडला लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘नारायण राणे कालबाह्य़, तटकरेंचे दुबईत फिक्सिंग’
आव्हान म्हणून पद स्वीकारले आहे. सहा वेळा खासदार झालो. शिवसेनेचे सगळे खासदार कर्तृत्वान आहेत. मात्र, मंत्रिपदाचे भाग्य रायगडला लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

First published on: 04-08-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena anant gite ncp narayan rane