अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. त्यातही भाजप-सेना युतीच्या जागा वाटपात एकही मतदार संघ पदरी न पडलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक जास्त अस्वस्थता असून पाच नगरसेवकांकडून बंडखोरी होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदार संघातून तर खडकवासला मतदार संघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी गटनेता संजय भोसले, नगरसेवक प्रमोद भानगिरे शुक्रवारी (४ ऑक्टोबर) अर्ज भरणार असून काँग्रेसकडूनही नगरसेवक आबा बागुल आणि रवींद्र धंगेकरशुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्यामध्ये युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. शहरातील सर्वच्या सर्व आठही मतदार संघांत भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आठपैकी एकही मतदार संघ न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आघाडीच्या जागा वाटपात हडपसर, वडगांव शेरी, पर्वती, खडकवासला मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढविणार असून काँग्रेस उमेदवारांच्या नावांची पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा मतदार संघासाठी घोषणा झाली आहे. तर मनसेचे उमेदवार कोथरूड, कसबा, हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून लढणार आहेत.
युतीमध्ये शिवसेनेला हडपसर आणि कोथरूड मतदार संघ मिळेल, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त होत होती. मात्र जागा वाटपात भाजपकडून शिवसेनेला ठेंगा दाखविण्यात आला. मतदार संघ पदरात पडेल, या अपेक्षेने शिवसैनिकांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र निर्णय होणार नाही हे लक्षात आल्यानंतर कसब्यातून नगरसेवक विशाल धनकवडे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच खडकवासला मतदार संघातून रमेश कोंडे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर प्रमोद भानगिरे, संजय भोसले हे दोघे शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसमध्येही बंडखोरी होणार असून कसब्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले रवींद्र धंगेकर आणि पर्वतीमधून पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. धंगेकर यांनी महापालिका निवडणुकी दरम्यान मनसेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी सन २००९ आणि २०१४ मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. सन २००९ मध्ये त्यांनी गिरीश बापट यांना कडवी लढत दिली होती. मात्र या वेळी या मतदार संघातून काँग्रेस गटनेता अरविंद शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या धंगेकर बंडखोरी करणार आहेत.
आघाडीच्या जागा वाटपात पर्वती मतदार संघ काँग्रेसला घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून पर्वती मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात आला नाही. या मतदार संघातून काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी तयारी केली होती. गेल्या निवडणुकीवेळी ते इच्छुक होते. मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनीही बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असून ते शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बंडखोरी टिकणार का?
काँग्रेस आणि शिवसेना उमेदवारांकडून बंडखोरी झाली असली, तरी ती कायम राहणार का, हा मुख्य प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ७ ऑक्टोबर आहे. बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न पक्षाच्या नेतृत्वाकडून आणि उमेदवारांकडून सुरू झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणुकीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल.
बंडखोरी करणारे नगरसेवक
रवींद्र धंगेकर, आबा बागुल, प्रमोद भानगिरे, विशाल धनवडे आणि संजय भोसले हे सर्व नगरसेवक आहेत. तर रमेश कोंडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.