भोसरीतील ‘शिवसृष्टी’ मुळे शहराच्या लौकिकात भर

पिंपरी महापालिकेने भोसरी लांडेवाडीतील प्रशस्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित शिवसृष्टी साकारली आहे.

पिंपरी महापालिकेने भोसरी लांडेवाडीतील प्रशस्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित शिवसृष्टी साकारली आहे. एक कोटीहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पामुळे शहरातील नावलौकिकात भर पडली आहे.
शहरातील १२ चौकांचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन पालिकेने केले, तेव्हा लांडेवाडी चौकाचे सुशोभीकरणाचा आग्रह आमदार विलास लांडे व महापौर मोहिनी लांडे यांनी धरला. त्यांच्या पाठपुरव्यातून साकारलेल्या शिवसृष्टीचे शिवजयंतीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित होते. शिवरायांचा जन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे २३ देखावे म्यूरलमध्ये तयार करण्यात आले आहेत. शिवकालीन माहिती, वस्तू, तोफा, मावळी वेशातील पहारेकरी, जिजाऊ तसेच बाल शिवाजी यांची शिल्प तयार  करण्यात आले आहे. याच परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असून किल्ल्यांच्या दरवाज्याची भव्य प्रतिकृती आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस आई भवानीचे मंदिर आहे. शिवसृष्टीमुळे लांडेवाडी चौक उजळून निघाला असून शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shivsrushti in bhosari powering citys fame