आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक मावळे धारातीर्थी पडले. स्वातंत्र्यलढय़ात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. या लाखमोलाच्या स्वातंत्र्याची किंमत आपण करतो का, याचा विचार करायला हवा. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण वावरतो. परंतु, केवळ जल्लोष करण्यापुरती महापुरुषांची आठवण करण्यापेक्षा त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजवायला हवेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली.
समस्त हिंदूू आघाडीतर्फे लाल महाल येथे शिवतेज दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले यांना शिवतेज पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, शाहीर दादा पासलकर, आघाडीचे कार्याध्यक्ष मििलद एकबोटे, सौरभ करडे, अनिल गानू, राजेंद्र शिंदे या वेळी उपस्थित होते. शाहिस्तेखानाची बोटे छाटून छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर पुन्हा भगवा ध्वज फडकाविल्याच्या घटनेचा आनंदोत्सव म्हणून शिवतेज दिन साजरा केला जातो.
तेंडुलकर म्हणाले, केवळ डेसिबलच्या भिंती उभारून आणि जल्लोष करून काहीच साध्य होणार नाही. आपल्या सर्वाकडे विचारशक्ती आहे. त्याचा विचारपूर्वक वापर करून हुतात्म्यांनी केलेल्या कार्याची जाण ठेवली पाहिजे.
विश्वास भोसले म्हणाले, शिवाजी महाराजांचे आचरण करण्यासाठी प्रत्येकाने मावळा होऊन काम केले पाहिजे. पशु-पक्ष्यांमध्ये गायीचे श्रेष्ठत्व आपण मान्य केले आहे. गोवंश हत्या बंदीचा कायदा असतानाही गायींची हत्या सुरूच होती. याबाबत नागरिकांकडून वेळोवेळी माहिती मिळाल्यास या हत्या रोखता येतील.
कसबा पेठ येथील नवा काळभैरवनाथ मंदिरापासून काढण्यात आलेली शिवरायांची मिरवणूक झांबरे चावडी, फडके हौदमार्गे लाल महाल येथे आली. या मिरवणुकीत त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठानने मर्दानी खेळ सादर केले. शाहीर दादा पासलकर आणि सहकाऱ्यांनी पोवाडे गायनाचा कार्यक्रम सादर केला. मिलिंद एकबोटे यांनी प्रास्ताविक केले. प्रीतम गीते यांनी सूत्रसंचालन केले.