भोर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या शाळेची घंटा वाजली आणि वर्गात येण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली. मात्र, हे विद्यार्थी होते शाळेचे माजी विद्यार्थी, ज्यांनी आता पन्नाशी ओलांडली आहे. कारण होते १९८५ च्या बॅचतर्फे आयोजित स्नेहसंमेलन. या सोहळ्यास शाळेचे माजी शिक्षकदेखील उत्साहाने उपस्थित राहिले आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा घेतली.

१९८५च्या दहावीच्या बॅचने शनिवार, १६ ऑगस्ट रोजी हे स्नेहसंमेलन शाळेच्या वास्तूतच आयोजित केले होते. विविध ठिकाणी स्थायिक झालेले विद्यार्थी या निमित्ताने मोठ्या उत्साहाने एकत्र जमले. त्या काळातील शिक्षक अहिरे सर, मेहेर सर, काळे सर तसेच सध्याचे प्राचार्य राऊत सर यांचीही उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरली. जवळपास ४० वर्षांनंतर भेटलेल्या या मित्रांनी एकमेकांची आपुलकीने विचारपूस केली. मात्र केवळ भेटीगाठी हाच हेतू नव्हता, आपल्या आयुष्याचा पाया रचणाऱ्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी भावना सर्वांच्या मनात होती.

शाळेला कोणत्या वस्तुंची अवश्यकता आहे याची माहिती त्यांनी अगोदरच घेऊन ठेवली होती. शाळेला खुर्च्यांची गरज असल्याचे त्यांना समजले होते. स्नेहसंमेलनाच्या दिवशी सर्वांनी मिळून शाळेला खुर्च्या भेट दिल्या. याचबरोबर शाळेभोवती वृक्षारोपण करून शाळेला झाडेदेखील भेट दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन मनोहर बाठे यांनी केले होते. सूत्रसंचालनाची जबाबदारी रामदास मगर यांनी समर्थपणे पार पाडली, तर अरुणा महागरे यांनी आत्मीयतेने पाहुण्यांचे स्वागत केले. संगीता मांडके आणि मीना काकडे यांच्या सुरेल स्वागत गीताने कार्यक्रमाला रंगत आणली. हेमलता जगताप यांनी पाहुण्यांचा सत्कार केला, तर नरेंद्र धोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेला साहित्य उपलब्ध करून देण्यात संजय भालघरे, नथू बाठे आणि रामदास मगर यांनी मोलाची भूमिका बजावली. शाळेच्या आवारात काही काळ आनंदात वेळ घालवल्यानंतर सर्वांनी आठवणींची शिदोरी हृदयात साठवून, पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.