पुणे : गेल्या काही दिवसांपासून होत असलेला मुसळधार पाऊस आणि दरड पडण्याचा धोका लक्षात घेऊन आपत्ती निवारणाच्या पाहणीसाठी शासकीय दौरा आयोजित करण्यात आला असल्याने गुरुवारी (२९ मे) सिंहगड पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठीही बंद राहणार आहे. कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी गडावर प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
सिंहगड आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाट रस्त्यावर तसेच पायी जाणाच्या मार्गांवर काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे, या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वन विभागाकडून आपत्ती निवारणासाठीची पाहणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही मार्गाने गडावर जाणे टाळावे, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी केले आहे.