पुणे : इंधन तसेच स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीची तीव्र झळ सोसावी लागत असताना दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात अल्पशी घट झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कृषी उपकर तसेच सीमाशुल्कात कपात केली आहे. त्याबरोबरच खाद्यतेलाच्या साठा मर्यादेवर निर्बंध आणले असल्याने बाजारात खाद्यतेलाची आवक वाढली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या पंधरा लिटरच्या डब्यामागे १५० ते २५० रुपयांनी घट झाली असून शेंगदाणा, सरकी तेलाच्या दरातील तेजी मात्र टिकून आहे.

गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. दिवाळीत खाद्यतेलाच्या मागणीत मोठी वाढ होते. फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींकडून तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलांच्या दरात घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे, असे मार्केटयार्ड भुसार बाजारातील तेल व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले. शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत. सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयात करावी लागते. सोयाबीन तेलाची आवक वाढली असून सूर्यफूल, पाम तेलाला मागणी आहे. खाद्यतेलांच्या दरात यापुढे फारशी घट होणार नाही, असेही ते म्हणाले.

जागतिक बाजारपेठेत तेलआयातीत भारत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. भारतात दरवर्षी दीडशे लाख टन तेलाची आयात केली जाते. देशाची तेलाची वार्षिक गरज २२५ लाख टन एवढी आहे. देशात साधारणपणे ८० लाख टन खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. मिठाई, खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पामतेलाला मोठी मागणी असते.

सोयाबीन, सूर्यफूल तेलाच्या १५ लिटरच्या डब्यामागे २०० ते २५० रुपयांची घट  झाली आहे. पामतेलाच्या डब्यामागे १०० ते १५० रुपयांनी घट झाली असली तरी शेंगदाणा आणि सरकी तेलाच्या (कॉटन सीड) दरातील तेजी मात्र टिकून आहे, असे नहार यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यात पामतेलाची १२ लाख ६२ हजार टन आयात करण्यात आली. शेंगदाणा, सरकी तेलाचे  उत्पादन देशात केले जाते. काही प्रमाणावर सूर्यफूल, पाम तेलाचे उत्पादन केले जाते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर उपाहारगृहे तसेच खाणावळी सुरू झाल्या आहेत. विवाह समारंभात उपस्थितीवरील निर्बंध शिथिल झाले असल्याने तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. घरगुती ग्राहकांकडून सूर्यफूल, सोयाबीन तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.  दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलांच्या दरात काहीशी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.  – रायकुमार नहार, खाद्यतेल व्यापारी, मार्केट यार्ड