आठवडाभर हलक्या पावसाचा अंदाज

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सकाळपासून दिवसभर अधून-मधून हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे संध्याकाळनंतर शहरात गारवा निर्माण झाला होता. पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

रविवारी सकाळपासून शहरात ढगाळ स्थिती होती. सकाळी आणि दुपारी काही भागामध्ये जोरदार सरी पडल्या. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. कोथरूड, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, धायरी, वडगाव, कात्रज, येरवडा, मुंढवा, हडपसर, शिवाजीनगर आदी भागांत दिवसभर हलक्या सरी कोसळल्या. पावसाच्या विश्रांतीमुळे ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले शहराचे कमाल तापमान रविवारी २७.८ अंशांपर्यंत खाली आले. संध्याकाळी तापमानात आणखी घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पुढील पाच ते सहा दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.