डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा अल्पपरिचय
जन्म- १ नोव्हेंबर १९४५
शिक्षण- एम.बी.बी.एस.
 
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते
– १९८२ पासून ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते.
– १९८९ मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. तेव्हापासून समितीचे कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. अंधश्रद्धाविरोधी काम करणारी अशा प्रकारची ही देशातील एकमेव संघटना आहे. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय संस्थेचे काम चालते. संघटनेच्या राज्यात १८० शाखा आहेत.  
– डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंनिस पुढील क्षेत्रांत प्रामुख्याने कार्यरत राहिली    
– वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि मानवता यांची जोपासना  
– नागरिकांचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी सातत्याचे प्रयत्न
– धार्मिक रूढी आणि परंपरांची सर्वसमावेशक विचाराने मीमांसा
– हानीकारक रूढी आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवून त्या रूढींसाठी पर्याय सुचवणे
– अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आणि त्यांना कारणीभूत ठरणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध अंनिसने उभारलेल्या मोहिमा गाजल्या.
लेखन-
– अंधश्रद्धामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संधिसाधूपणा उघड करणारी पुस्तके दाभोलकर यांनी लिहिली आहेत. ऐसे कैसे झाले भोंदू, अंधश्रद्धा विनाशाय, अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, भ्रम आणि निरास, प्रश्न मनाचे, ठरलं डोळस व्हायचंय!, विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी, मती भानामती, श्रद्धा-अंधश्रद्धा, तिमिरातून तेजाकडे, विचार तर कराल?, आदी पुस्तकांचा त्यांत समावेश आहे.
‘साधना’चे मानद संपादक
– साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या ‘साधना’ या साप्ताहिकाचे मानद संपादकपद ते गेली बाराहून अधिक वर्षे सांभाळत होते.
– ध्येयवादी पत्रकारितेचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या साधनाने नुकतीच ६५ वर्षे पूर्ण केली आहेत.
– सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परिवर्तनाचे विषय साधनातून सातत्याने हाताळले गेले आहेत.
‘सामाजिक कृतज्ञता निधी’चे कार्यवाह
– परिवर्तनवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाबद्दल मानधन देता यावे म्हणून ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ची सुरुवात करण्यात आली. या निधीच्या स्थापनेपासून डॉ. दाभोलकर त्याचे कार्यवाह म्हणून काम पाहत होते.  
– हा निधी एक कोटी रुपयांचा आहे. या रकमेच्या व्याजातून दरमहा पन्नास कार्यकर्त्यांना एक हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
– गेली अठरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे.
परिवर्तन संस्थेचे संस्थापक व कार्यवाह
– परिवर्तन ही संस्था स्थापन झाल्यापासून डॉ. दाभोलकर संस्थेचे कार्यवाह होते.   
– या संस्थेमार्फत व्यसनमुक्तीसाठी निवासी स्वरूपाचे कार्य मोठय़ा प्रमाणावर चालवले जाते.
– जैविक शेती, पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रबोधन ही कार्येही संस्था करते.
राष्ट्रीय कबड्डी खेळाडू
– डॉ. दाभोलकर कबड्डी या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू होते.
– खेळात कार्यरत असताना बांग्लादेशाविरोधातील कबड्डी कसोटी सामन्यात देशाकडून खेळण्यासाठी त्यांची निवड झाली होती.
– कबड्डीसाठी देण्यात येणारा राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती’ हा सर्वोच्च पुरस्कार तसेच ‘शिवछत्रपती युवा पुरस्कार’ही त्यांना मिळाला होता.