‘स्मार्ट सिटी’मध्ये अशास्त्रीय, सदोष कामांमुळेच पाणी तुंबण्याच्या घटना

चुकीच्या पद्धतीने बांधलेले दुभाजक, रस्त्यांचे बेसुमार काँक्रिटीकरण, पावसाचे पाणी निचरा होण्यासाठीच्या यंत्रणेचा अभाव, पावसाळी गटारांचा कागदावरच राहिलेला आराखडा, रस्त्यांची अशास्त्रीय आणि सदोष कामे, नाल्यांवर झालेली अतिक्रमणे, झपाटय़ाने होत असलेले नागरीकरण अशा विविध कारणांमुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहरात थोडय़ा पावसातही पाणी तुंबण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाढते नागरीकरण आणि शहरीकरणही या प्रकाराला जबाबदार असून स्मार्ट सिटीच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची मूळ मुद्दय़ाकडे गांभीर्याने पाहण्याची असंवेदनशीलताही या प्रकारांमुळे स्पष्ट झाली आहे.

शहराला सप्टेंबर महिन्यात आणि त्यानंतर बुधवारी (९ ऑक्टोबर) झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तासभरच झालेल्या पावसाने शहराची अक्षरक्ष: वाताहात झाली. नाले तुंबण्याच्या, रस्त्यांवर पाणी साठण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली. मात्र या पावसाने स्मार्ट सिटीचे विदारक चित्र पुढे आणले आहे. पावसाळ्याच्या कालावधीत शहरात साचणारे पाणी, सोसायटय़ा, झोपडपट्टय़ांमध्ये शिरणारे पाणी यांचा विचार करून उपाय केल्याचा दावाही फोल ठरला आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने पावसाळी गटारे व्यवस्थापनाची योजना हाती घेतली असून ४८२ कोटी रुपयांची ही योजना आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार आहे. या योजनेअंतर्गत ११५ कोटींच्या कामांना पहिल्या टप्प्यात प्रारंभ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची कामे सुरू झालेली नाहीत.

सदोष रस्ते बांधणी

कोणताही रस्ता मध्यभागी उंच असावा, दोन्ही बाजूंनी त्याला सूक्ष्म उतार असावा, उताराच्या शेवटी पावसाचे पाणी वाहून नेण्याची यंत्रणा असावी, ही शास्त्रीय पद्धत आहे. मात्र त्याला खो घालत हव्या तशा पद्धतीने रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे. शास्त्रीय पद्धतीने रस्ते बांधले जात नसल्यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेचाही प्रश्न पुढे आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत महाापालिका अद्यापही गंभीर नाही, ही वस्तुस्थिती आहे. एका महत्त्वाच्या, नागरिकांशी थेट संबंधित असलेल्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी केवळ राजकारण करण्यात येत आहे.

खापर फोडले मेट्रोच्या कामावर

राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत शहरात पाणी तुंबण्याच्या घटना मोठय़ा संख्येने होत नाहीत, असा दाखला देऊन स्वत:ची पाठ थोपटण्याचे प्रकार महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. आता अपयश झाकण्यासाठी त्याचे खापर मेट्रोच्या कामावरही फोडले जात आहे. मेट्रोच्या कामामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतीलही, मात्र ज्या भागात मेट्रोचे काम नाही तिथे पाणी का तुंबते, नाले का ओसंडून वाहतात, याबाबत मात्र मौन बाळगले जात आहे.

कारणे अशी

  •  सलग बांधलेले रस्ते दुभाजक
  •  पावसाळी गटारांचा अभाव
  •  रस्त्यांची सदोष बांधणी
  •  रस्त्यांचे बेसुमार सिमेंट काँक्रिटीकरण
  •  अनेक ठिकाणी सुरू असलेले मेट्रोचे काम
  •  अशास्त्रीय रस्ते खोदाई

रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळी गटारांची उंची, त्यांची स्वच्छता या बाबीही पाणी तुंबण्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे आता काँक्रिटीकरण थांबविण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच